ऑगस्टमध्ये दोन ग्रहणे, पण भारतातून दिसणार नाहीत

मुंबई : येत्या बुधवारी 12 ऑगस्ट रोजी आषाढ अमावास्येच्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे, परंतु भारतातून ते दिसणार नाही. तसेच शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे परंतु तेही भारतातून दिसणार नसल्याचे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

याविषयी अधिक माहिती देतांना श्री.सोमण म्हणाले की बुधवार 12 ऑगस्टच्या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती ग्रीनलॅन्ड, आईसलॅन्ड, रशिया, स्पेन, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क आणि फ्रान्सचा काही भाग येथून दिसेल. या सूर्यग्रहणाची खग्रास स्थिती २ मिनिटे १८ सेकंद दिसेल. हे सूर्यग्रहण रात्री ९.०४ ते उत्तररात्री १.२८ यावेळेत होईल.
भारतातून दिसणारे खंडग्रास सूर्यग्रहण पुढीलवर्षी २ ऑगस्ट २०२७ रोजी होणार आहे.
शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ६.५४ ते दुपारी १२.३२ या वेळेत होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. हे चंद्रग्रहण अमेरिका, आफ्रिका आणि यूरोपचा काही भाग येथून दिसेल.