विरुद्ध दिशेने वाहने हाकणे चालकांना पडले महागात

कल्याण फाट्यावर तीन तासांत ३० जणांवर गुन्हे

ठाणे: खिडकाळीहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील कल्याण फाटा येथे विरुद्ध दिशेने वाहन हाकणाऱ्या ३० वाहनचालकांवर अवघ्या तीन तासांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यामध्ये मोटारगाड्या, दुचाकी तसेच एका महिला दुचाकीस्वाराचाही समावेश आहे. मुंब्रा वाहतूक विभाग आणि डायघर पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे ही धडाकेबाज कारवाई केली आहे.

मुंब्रा वाहतूक विभाग तसेच डायघर पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे सोमवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत कल्याण फाटा येथे विशेष मोहीम राबवली. खिडकाळीहून कल्याण फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अनेक वाहनचालक वाहतूक नियमांना हरताळ फासत विरुद्ध दिशेने बेशिस्तपणे वाहने चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण होत असल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित वाहनचालकांना ताब्यात घेतले. या कारवाईत मोटारगाड्या, दुचाकी तसेच एका महिला दुचाकीस्वाराचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, केवळ दंड आकारण्यावर न थांबता धोकादायक पद्धतीने वाहन चालवून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी संबंधित चालकांविरोधात शीळ-डायघर पोलिस ठाण्यात थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंब्रा वाहतुक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अतुल आहेर यांनी दिली. दरम्यान, या धडाकेबाज कारवाईमुळे विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.