खड्ड्याने घेतला ठामपाच्या टीडीआरएफ जवानाचा बळी

ठाणे-नाशिक महामार्गांवर दोन दिवसांत दोन बळी

ठाणे: ठाणे-नाशिक महामार्गांवर पडलेल्या खड्ड्याने मागिल दोन दिवसात दोन जणांचे बळी घेतले आहेत. आज शहापूर येथे खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात ठाणे महापालिकेच्या टीडीआरएफ जवानाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

विकास गोरे जवानाचे नाव आहे. तो शहापूर येथिल बामणे गाव येथे राहत होता. आज पहाटे ५ वाजता दुचाकीवरुन कामाला येत असताना मुंबई-नाशिक महामार्गावरील भारंगी नदीवरील पुलावर पडलेल्या खड्ड्यात त्याची दुचाकी आदळून तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे शहापूर येथील ग्रामस्थ आणि त्यांचे नातेवाईक संतप्त झाले होते. त्यांनी शहापूर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत महामार्गाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती.

दोन दिवसापूर्वी भिवंडी येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या मदतीला हा जवान धावून गेला होता. विकासचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला दीड वर्षांच्या दोन जुळ्या मुली आहेत. पत्नी, भाऊ, आई असा त्याचा परिवार आहे. एक वर्षापूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्याच्या निधनाने ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागावर शोककळा पसरली असून चांगला जवान आम्हाला सोडून गेला, अशी प्रतिक्रिया त्याच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान काल अंजूरफाटा राहनाळ मार्गावर देखिल खड्ड्यात दुचाकी पडून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर जबर जखमी झालेल्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुनीता पाल (४६) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे सुनीता आणि त्यांचे पती ठाण्यातील मनोरमा नगर येथे राहत होते. त्यांचे पती अक्षयलाल यांच्यासह दुचाकीवरून अंजूरफाटा येथे फ्लॅट पाहण्यासाठी जात होते. राहनाळ येथे सिमेंट काँक्रीट रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते, तो खड्डा त्यांचे पती यांना दिसला नाही. त्या खड्ड्यात आदळून ते दोघे खाली पडले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या कंटेनरच्या खाली येऊन सुनीता यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रशासनाने रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने दुरुस्त करून नागरिकांचे जीव वाचवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.