डोंबिवली: कल्याण, डोंबिवली परिसरातील वाहतुकीला नवीन आयाम देणाऱ्या जलवाहतुकीच्या रो-रो सेवेचा महत्वपूर्ण टप्पा येत्या डिसेंबर अखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहे. त्याचबरोबर वाॅटर मेट्रो, पाॅड टॅक्सी सेवेचाही शुभारंभ करण्याच्या प्रयत्नात असल्याचे भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
जेट्टीपर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्याचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला. यावेळी माहिती देण्यात आली.
पाच ते सहा वर्षांपासून नगरसेवक दीपेश म्हात्रे या जलवाहतुकीसाठी प्रयत्नशील आहेत. मोठागाव प्रभाग हद्दीत उल्हास खाडी किनारी ही जलवाहतूक सुरू व्हावी, यासाठी म्हात्रे यांनी शासनस्तरावर, सागरी वाहतूक महामंडळाकडे पाठपुरावा केला होता. यामुळे आता लवकरच ही सेवा सुरू होण्याच्या दृष्टीक्षेपात आहे. मोठागाव रो रो जेट्टीपर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता होता. या रस्त्याची डागडुजी करून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.
रस्त्याच्या शुभारंभानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले, कल्याण-डोंबिवली शहर परिसरात एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि इतर विभागांकडून विविध रस्ते, पुलांची कामे सुरू आहेत. नागरिकांना प्रवासाचे विविध मार्ग उपलब्ध व्हावेत, त्यांना झटपट प्रवास करता यावा आणि इंधन बचत व्हावी, वाहन कोंडीतून प्रवाशांची मुक्तता व्हावी हा या प्रकल्पांमागील शासनाचा मुख्य उद्देश आहे. आता डोंबिवलीत या रस्ते मार्ग, पुलांच्या जोडीला डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव भागातून जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे. यामुळे थेट ठाणे, भाईंदर, वसई विरार, नवी मुंबईत पोहचता येणार आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून मोठागाव गणेशघाट येथे रो रो सेवा, वाॅटर मेट्रोचा प्रकल्प आकाराला येत आहे. येथून ठाणे, मीरा-भाईंदर आणि वसई-विरारपर्यंत, तसेच मोठागाव, ठाणे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत ही सेवा उपलब्ध असणार आहे. शिळफाटा, काटई बदलापूर रस्ता, डोंबिवली ते ठाणे रस्ते मार्गावरील वाहनांचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. आणि वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. त्यामुळे हा जलवाहतूक प्रकल्प लवकर मार्गी लागावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र सागरी महामंडळ मंत्री नितेश राणे अधिक प्रयत्नशील आहेत, असे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.