आषाढी यात्रेत ‘लालपरी’; विठुदर्शनाने कृतकृत्य वारकरी

५५०० बसेसद्वारे नऊ लाखांहून अधिक भाविकांचा सुखरूप-सुरक्षित प्रवास

मुंबई : ‘पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो भाविकांच्या प्रवासात यंदाही महाराष्ट्राची ‘लालपरी’ विश्वासाची सोबती ठरली.

आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने सुमारे ५,५०० बसेसच्या माध्यमातून ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांना सुखरूप आणि सुरक्षित प्रवास घडवला. लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य एसटी परिवाराला लाभले, ही आमच्यासाठी विठुरायाची कृपाच असल्याची भावनिक प्रतिक्रिया परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने राज्याच्या विविध भागांतून पंढरपूरसाठी विशेष वाहतुकीचे नियोजन केले होते. यात्रेच्या कालावधीत एसटीच्या २१ हजार ५२७ फेऱ्यांद्वारे ९ लाख २४ हजार ७३८ भाविक-प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे, यात्रेच्या वाहतुकीतून एसटी महामंडळाला ४१ कोटी १८ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात सुमारे पाच कोटी ३० लाख रुपयांची वाढ झाली आहे.

याबाबत सरनाईक म्हणाले, “गळ्यात तुळशीची माळ, मुखी विठ्ठलाचे नाम आणि मनात पांडुरंगाच्या भेटीची ओढ घेऊन लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. त्यांच्या या भक्तिमय प्रवासाचा एक छोटासा भाग होण्याचे भाग्य आपल्या लालपरीला दरवर्षी लाभते. एखाद्या भाविकाला विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला सुखरूप पोहोचवणे आणि दर्शनानंतर त्याला सुरक्षितपणे आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचवणे, ही केवळ प्रवासी वाहतूक नाही; ती एसटीच्या माध्यमातून घडणारी विठ्ठलसेवाच आहे.”