मुंब्र्याच्या विकासासाठी खा. शिंदे आणि आ. आव्हाड एकत्र येणार

विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचा विश्वास

​ठाणे : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा-कौसाच्या विकासासाठी एकत्र आल्यामुळे या भागातील प्रलंबित विकासकामांना आता खऱ्या अर्थाने गती मिळेल, असा विश्वास ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी व्यक्त केला आहे. मुंब्रा-कौसा परिसरातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज आयुक्त सौरव राव यांनी मुंब्रा भागाचा दौरा केला. त्यानंतर शानू पठाण यांनी हा विश्वास व्यक्त केला.

​मुंब्रा-कौसा भागातील वाढत्या नागरी समस्या आणि रखडलेल्या प्रकल्पांवर तोडगा काढण्यासाठी विविध विकासकामांचा अजेंडा हाती घेण्यात आला असून, रस्त्यावरील फेरीवाल्यांचे (हॉकर्सचे) मित्तल येथे तत्काळ पुनर्वसन करून, मुंब्र्यातील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येपासून दिलासा मिळवून देण्यात येणार आहे. वाहतुकीची वर्दळ आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंब्रा स्टेशन ते दाभूळकर रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे. पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्य रस्त्यावरील नाले थेट मित्तल खाडीच्या मुख्य नाल्याशी जोडणे तसेच, वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी चुहा पूल ते रेती बंदर या मार्गाला जोडणाऱ्या एका नवीन रस्त्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मार्गी लावणे, स्थानिक तरुणांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा यासाठी स्टेडियममधील स्विमिंग पूलसह सर्व प्रलंबित विकासकामे विहित मुदतीत पूर्ण करणे आदी कामे लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासनाने दिले असल्याचे पठाण यांनी सांगितले.

या विकासकामांच्या आढाव्यादरम्यानच महापालिका आयुक्तांनी अलीकडेच दुर्घटना घडलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आयुक्तांनी त्यांचे सांत्वन केले आणि शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.