प्रभाग समित्या सभापती निवडीच्या हालचाली सुरू

ठाणे महापालिकेचे कोकण आयुक्तांना पत्र

ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध विषय समित्यांचा प्रश्न प्रलंबित असताना प्रशासनाने नऊ प्रभाग समित्यांच्या सभापती निवडणुकांसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या निवडणुकांचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी प्रशासनाने कोकण विभागीय आयुक्तांकडे अधिकृत पत्र पाठविले आहे.

ठाणे महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी तर १६ जानेवारीला निकाल जाहीर झाला. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांत स्वीकृत सदस्यांसह स्थायी समिती, परिवहन समिती आणि शिक्षण समितीची स्थापना रखडली आहे. यामुळे महापालिकेच्या प्रशासनावर त्याचा थेट परिणाम होत आहे. स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने तिच्या अखत्यारीतील अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि प्रशासकीय विषय थेट महासभेत मांडावे लागत आहेत. त्यामुळे निर्णय प्रक्रियेला विलंब होत असून कामकाजाची गतीही मंदावल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. तसेच स्वीकृत सदस्यांची नियुक्ती न झाल्याने विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्तींना सभागृहात प्रतिनिधित्व मिळण्याची संधीही अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे इच्छुकांसह नगरसेवकांमध्ये देखील नाराजीचे वातावरण आहे.

दरम्यान, महापालिका सचिव मनीष जोशी यांनी गुरुवारी कोकण विभागीय आयुक्तांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून नऊ प्रभाग समित्यांच्या सभापती निवडणुकांचे वेळापत्रक कळविण्याची विनंती केली आहे. आयुक्त कार्यालयाकडून वेळापत्रक प्राप्त होताच निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाईल. तसेच आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात सर्व नऊ प्रभाग समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे.

प्रभाग समित्यांच्या सभापती निवडणुका घेण्यासाठी आवश्यक वेळापत्रक मागविण्यात आले असून, कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ते प्राप्त झाल्यानंतर पुढील निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येईल, असे महापालिका सचिव मनीष जोशी यांनी सांगितले.