ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निष्कासन विभागाने विविध प्रभाग समिती क्षेत्रांमधील शाळा परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर विशेष कारवाई मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत विविध प्रभाग समिती क्षेत्रांतील एकूण ५३ अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट, गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला. सिडको येथील बेडेकर महाविद्यालयासमोरील टपरी, महागिरी येथील ठाणे पोलीस स्कूलसमोरील टपरी, तसेच एन.के.टी. महाविद्यालयासमोरील टपरी, जांभळी नाका येथील पेढ्या मारुती मंदिराशेजारील टपरीवर कारवाई करण्यात आली असून या सर्व टप-यावरून गुटखा , पानमसालाजन्य पदार्थ, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
चरई येथील दगडी स्कूलसमोरील,चरई येथील महाराष्ट्र विद्यालयासमोरील टपरीवरून पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेट जप्त करण्यात आल्या. तसेच राम मारुती रोड येथील शिव समर्थ स्कूलसमोरील टपरीवरही कारवाई करण्यात आली. ठाणे महानगरपालिका शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी तसेच अनधिकृत टपऱ्यांविरोधात अशाच प्रकारच्या धडक कारवाया सातत्याने सुरू ठेवणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सदरची कारवाई उपायुक्त अतिक्रमण जितेंद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ १ चे उपायुक्त दीपक झिंजाड , परिमंडळ २ च्या उपायुक्त मिताली संचेती, परिमंडळ ३ चे उपायुक्त दिनेश तायडे यांच्या समन्वयातून करण्यात आली. सदरची कारवाई प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
नौपाडा कोपरी प्रभागात २१ पानटपऱ्या, वर्तकनगर दोन पानटपऱ्या, दोन हातगाड्या, उथळसर दोन पानटपऱ्या, पाच हातगाड्या, कळवा एक पानटपरी, १० हातगाड्या, मुंब्रा ११ पानटपऱ्या, आठ हातगाड्या, माजिवडा मानपाडा सात पानटपऱ्या, १२ हातगाड्या, दिवा दोन पानटपऱ्या, पाच हातगाड्या आणि लोकमान्य सावरकर प्रभागात सात पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.