पालघर : राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील १३ कर्जधारकांना ८९.५१ कोटी रुपयांचा दिलासा मिळणार असून आहे.
शेतकरी कर्ज व वीज बिल बाकी संदर्भात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातील १२,३५४ शेतकऱ्यांनी १३,०७६ खात्यांमधून कर्ज घेतले असून शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक कर्ज धारकाला दोन लाख रुपयांच्या शेतकरी कर्ज (पीक कर्ज) माफ करण्यात आले आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान कर्ज घेतलेल्या व ३१ मार्च २०२६ रोजी थकीत असणाऱ्या या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जफेड व भरणा केला आहे अशांना दुसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान रक्कम वितरित करण्यात येईल असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्ह्यात शेतकी पंपासाठी वीज बिल धारक व वीजबिल माफीसाठी पात्र शेतकऱ्यांचा तपशील जिल्हा प्रशासन लवकरच सादर करेल असे याप्रसंगी सांगण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी संबंधित सहकारी सोसायटी, सहकार विभागाच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार असून लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्ह्यात असणाऱ्या ८११ आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन इ-केवायसी करून कर्जमाफीसाठी पात्र होणे आवश्यक करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, डिझेल पंप व इतर शेतकी यंत्रांसाठी सुट्या डिझेलची उपलब्धता होत नसल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून ज्या घटकांना दैनंदिन कामकाजासाठी डिझेलची आवश्यकता आहे अशांसाठी प्रमाणपत्राच्या आधारे नेमून दिलेल्या प्रमाणात डिझेल सुट्ट्या पद्धतीने उपलब्ध करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.