यापुढे ठामपा शाळेत पहिल्या दिवसापासूनच गणवेश

पुढील वर्षाचीही निविदा जारी

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी होणारी गणवेशाची प्रतिक्षा पुढील वर्षापासून संपुष्टात येणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये यंदा गणवेश पुरवठ्यासाठी शिक्षण विभागाने प्रथमच दोन वर्षांच्या निविदा मागविल्या आहेत. या संदर्भात भाजपच्या नगरसेविका माधुरी मेटांगे यांच्याकडून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेच्या १२४ शाळांमध्ये सुमारे २४ हजार विद्यार्थ्यांना बूट, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. बहुसंख्य विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी ही सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देण्याची अपेक्षा असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महापालिका प्रशासनाकडून गणवेशाची निविदा काढण्यासाठी नाहक दिरंगाई होते. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश मिळतो. तोपर्यंत विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशावर शाळेत यावे लागत असते.

हजारो विद्यार्थ्यांच्या संवेदनशील प्रश्नाबाबत मूळ शिक्षिका असलेल्या भाजपच्या नगरसेविका माधुरी मेटांगे यांनी निवडून आल्यापासून पुढाकार घेतला. राज्य सरकारच्या माध्यमातून दरवर्षी जून महिन्यात शाळा सुरू होण्याची तारीख जाहीर केली जाते. मात्र, तारीख निश्चित असतानाही गणवेशाच्या निविदा उशीरा काढल्या जात असल्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश मिळत नव्हता. या परिस्थितीबाबत नगरसेविका माधुरी मेटांगे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव, उपायुक्त डॉ. मिताली संचेती आणि शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच दरवर्षी मार्चपासून किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा जारी करण्याचा आग्रह धरला. यंदाच्या शैक्षणिक वर्षात निविदा जारी होण्यास उशीर होणार असला तरी, दोन वर्षांची निविदा एकत्रितरित्या काढावी, अशी माधुरी मेटांगे यांची मागणी होती. त्याला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्यता दिली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या महासभेत प्रस्ताव मंजूर करून दोन वर्षांसाठी गणवेश पुरवठ्याच्या निविदा जारी करण्यात आल्या आहेत.