मालमत्ता करापोटी नागरिकांकडून १००.३० कोटींचा भरणा
कल्याण: महानगरपालिकेने वेळोवळी केलेल्या आवाहनाला करदात्या नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, जून अखेरपर्यंत मालमत्ता करापोटी सुमारे १००.३० कोटींचा भरणा महानगरपालिकेच्या तिजोरीत केला आहे.
एक लाख १९,४६४ करदात्या नागरीकांनी ४८.७२ कोटी इतका ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कराचा भरणा करुन या सुविधेचा लाभ घेतला आहे. गतवर्षी माहे जून २०२५ पर्यंत मालमत्ता करापोटी ६७.८८ कोटी इतका भरणा झाला होता.
३१ जुलै २०२६पर्यंत पाच टक्के सवलतीची सुविधा असल्याने तसेच ऑनलाईन भरण्यावर दोन टक्के सूट महानगरपालिकेने जाहीर केल्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी घरबसल्या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन अथवा देयकावरील क्युआर कोडच्या ऑनलाईन माध्यमातून मालमत्ता कराचा भरणा करावा व आपल्या नगरीच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.