अंबरनाथमध्ये पूर्णाकृती पुतळ्यासाठी दोन कोटींचा निधी
अंबरनाथ: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आणि स्मृतीला कायमस्वरूपी अभिवादन करणारे भव्य स्मारक आता अंबरनाथमध्ये साकारले जाणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
अंबरनाथच्या पश्चिमेला धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी देखील यासाठी पाठपुरावा केला होता.
अंबरनाथ शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जपणारे, त्यांचे साहित्य, शाहिरी आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करणारे एक हक्काचे ठिकाण असावे, अशी मागणी शहरातील नागरिक, विविध सामाजिक संस्था, साहित्यप्रेमी आणि विविध चळवळीतील कार्यकर्त्यांकडून सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत खासदार डॉ. शिंदे यांनी शासन स्तरावर याबाबत प्रभावीपणे विषय मांडला आणि त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी खासदार डॉ. शिंदे यांनी या परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. दिलेला शब्द पाळत त्यांनी या कामासाठी शासनाकडून निधी मंजूर करून घेतला असून, आता ते आश्वासन प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शिल्पकार होते. त्यांनी आपल्या साहित्य, लोकशाहिरी आणि विचारांच्या माध्यमातून शोषित, वंचित, कष्टकरी आणि सर्वसामान्य समाजाला आवाज दिला. त्यांच्या कार्याची प्रेरणा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावी, त्यांच्या विचारांचा वारसा जपला जावा आणि त्यांच्या स्मृतींना अंबरनाथमध्ये कायमस्वरूपी मानाचे स्थान मिळावे, या उद्देशाने हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार या प्रकल्पाची अंमलबजावणी अंबरनाथ नगरपरिषदेमार्फत करण्यात येणार असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेला दोन कोटी रुपयांचा खर्च राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करणारे हे स्मारक केवळ एक पुतळा न राहता सामाजिक समतेचा, परिवर्तनाचा आणि प्रेरणेचा संदेश देणारे ऐतिहासिक स्मृतिस्थळ ठरणार आहे. अंबरनाथकरांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, खासदार डॉ. शिंदे यांच्या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.