मुंबईतील उपनगरी गाडीत किरकोळ वादातून एका तरुणाची सहप्रवाशांच्या देखत निर्घृण हत्या झाली आणि त्यामुळे समाज म्हणे हादरला आहे. आम्ही ‘म्हणे’ हा शब्द वापरायचे कारण हादरलेला समाज खून होताना व्हिडिओ शूटिंग करीत नसतो, तो उलट या तरुणाच्या मदतीसाठी धावला असता. ही सामूहिक जबाबदारी समाज विसरला असेल तर दोष सिस्टीमवर टाकून हात वर करता येणार नाहीत. खुन्यापेक्षा बघ्यांचे हात रक्ताने माखले आहेत असेच मग म्हणावे लागेल. सुन्नबिन्नपणाची भावना त्यामुळे पोकळ आहे. समाज अशा धक्कादायक घटनांना सरावला आहे असेच खेदाने म्हणावे लागेल.
उपनगरी गाड्यांतील गर्दी, सेवेची गुणवत्ता, मागणी-पुरवठ्याचे बिघडलेले गणित, रेल्वे अधिकाऱ्यांची उदासीनता आदी बाबींमुळे प्रवाशांची मानसिकता बिघडली आहे. एकप्रकारचे वैफल्य त्यांच्यात आले आहे. याचा अर्थ दररोज होणारे वाद, हिंसाचार आदी गोष्टींचे समर्थन होऊ शकत नाही. परंतु ते होण्यामागची कारणे समजून घेतली जात नाहीत आणि त्यातून प्रवाशांच्या सहनशक्तीचा कडेलोट होतो. योग्य उपाययोजना वेळीच होत नसतील तर ‘सिस्टीम फेल्युअर’ झाले आहे, असे ठामपणे म्हणता येईल. खुनाची ताजी घटना हा त्याचा ढळढळीत पुरावा आहे. ओसंडून वाहणाऱ्या रेल्वे गाड्यांतून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी किंवा मंत्री महोदयांनी एकदा तरी प्रवास करून पहावाच. प्रवासी कोणत्या मरण-यातनांना दररोज सामोरे जातात याचा त्यांना अंदाज येईल.
या खुनाची घटना परदेशात, विशेष करून अमेरिकेत तर घडली नाही ना, असे प्रथमदर्शनी वाटू शकते. तिथे माथेफिरू मंडळी असे हल्ले किंवा बेछूट गोळीबार नित्यनेमाने करीत असतात. याचा अर्थ भारताची अमेरिका झाली आहे असा तर्क काढावा लागेल. परंतु अमेरिकी समाज अशा घटनांकडे जितक्या अलिप्तपणे पाहत असतो तसे भारतीयांनी वागणे आपल्या सहिष्णुता आणि संस्कारमूल्यांना साजेसे नाही. खुनी आरोपी मुळात चाकू घेऊन का फिरत होता? किरकोळ वाद हेच खरे निमित्त होते की गुन्हा हा पूर्वनियोजित किंवा पूर्ववैमनस्यातून झाला हे तपासाअंती सिद्ध होईलच. परंतु तरुणांमधील वैफल्य, त्यातून आलेली असहिष्णुता आणि भरकटलेपण हे निरोगी समाजाचे लक्षण नाही. ही बाब ‘सिस्टीम फेल्युअर’मधूनच तयार झाली असेल तर समाजातील या अप्रस्तुत आणि निंदनीय बदलाचा बारकाईने अभ्यास करून त्यावर मार्ग काढावाच लागेल.
आपण दैनंदिन जगण्याकडे कधीपासून गांभीर्याने पाहणार आहोत? आपण जे जीवन जगतोय ते चित्रपटातील दृश्य नाही. त्यात माणसे खोटी-खोटी मरत असतात. इथे सर्वकाही खरे आहे. एक होतकरू तरुण नाहक बळी गेला आहे. आपला तरुण मुलगा किंवा मुलगी संध्याकाळी घरी सुखरुप येईल काय ही चिंता पालकाना भेडसावत आहे. त्यांना कोण दिलासा देणार? गुन्हेगारांमध्ये एवढे धाडस येतेच कोठून? एक आयुष्य संपवताना आपले आयुष्यही संपणार याची भीती जर समाजास वाटत नसेल तर ते सामूहिक पराभवाचे लक्षण मानायला हवे. मुंबईतील या घटनेकडे माध्यमांपासून सर्वसामान्य माणसे जोवर त्याकडे केवळ सनसनाटी बातमीच्या नजरेने पाहणे सोडत नाहीत, तोवर हा रक्तरंजित प्रवास सुरूच राहणार. तो सिस्टीमपेक्षा आपल्याच व्यक्तिगत फेल्युअरचा भाग असेल. मोबाईल हे संवादाचे साधन आहे, चित्रीकरण करण्याचे नाही. अर्थात चित्रफितीमुळे आरोपी सापडू शकला. पण त्या तरुणाचा प्राण तर गेलाच ना? सद्गुणी माणसांनी एकी दाखवण्याची वेळ आली आहे. ही साधी गोष्ट प्रत्येकाने स्वतःवर प्रतिबिंबित करण्याची गरज आहे.