ठाणे: 900 मी.मी. व्यासाची नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरिता जलवाहिनीच्या जोडकामासाठी शुक्रवारी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीएमार्फत आनंदनगर ते साकेतपर्यंत एलिव्हेटेड रोडचे कामादरम्यान इंदिरानगर संपकडे जाणारी 813 मी.मी. व्यासाची उर्ध्ववाहिनी बाधित होत असल्याने एमएमआरडीएकडून 900 मी.मी. व्यासाची जलवाहिनी 2200 मीटरपैकी 800 मीटर अंतरापर्यंत अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. 800 मीटर अंतरापर्यंत अस्तित्वातील 813 मी.मी. व्यासाची जलवाहिनी निकामी करुन नव्याने अंथरण्यात आलेली 900 मी.मी. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरिता जलवाहिनीच्या जोडकामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची मागणी केली आहे.
या कामाकरिता शुक्रवार 12 जून रोजी सकाळी 9 ते शनिवार 13 जून रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावरकरनगर, लोकमान्य नगर पाडा नं. 2, 3, व 4, चैतीनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रुपादेवी पाडा, रामनगर, सी.पी.तलाव, येऊर परिसर इत्यादी भागाचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपरुवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.