अनधिकृत मसाला गिरण्या ठाण्यात भरडणार युतीधर्म

* ठोस कारवाईसाठी व्यापारी आणि रहिवाशांचे ठामपा मुख्यालयावर आंदोलन

* मित्र पक्ष आणि प्रशासनावर आमदार संजय केळकर यांचा आरोप

ठाणे : ठाण्यातील महात्मा फुले मार्केटमध्ये असलेल्या अनधिकृत मसाला गिरण्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असताना प्रशासन त्यावर ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप करत स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आज ठाणे महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनात आमदार संजय केळकर यांनी सहभागी होत प्रशासन आणि मित्रपक्ष अनधिकृत व्यवसायाला पाठीशी घालून नागरिकांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला.

महात्मा फुले मार्केटमध्ये सुमारे ५०० लहान-मोठे व्यापारी व्यवसाय करत आहेत. या मार्केटमध्ये परवाना नसताना मसाला गिरण्या सुरू असून ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे येथील व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत येथील व्यापारी आणि रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत तक्रार केली होती. श्री.केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर या गिरण्यांवर कारवाई करण्यात आली होती, मात्र त्या पुन्हा सुरू झाल्याने स्थानिक आक्रमक झाले. आज व्यापारी आणि रहिवाशांनी ठाणे महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी आमदार संजय केळकर यांनी आंदोलनात सहभागी होत आंदोलकांना पाठिंबा दिला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकले. तसेच दोन दिवसांत कारवाई करतो, असे आश्वासन दिले. मात्र आमदार संजय केळकर यांनी २४ तासांत या गिरण्या कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली. यावेळी रहिवाशांनी प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

याबाबत बोलताना श्री.केळकर म्हणाले, आयुक्तांनी गिरण्यांवर कारवाई करण्याचे चारवेळा आदेश दिले, परंतु प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही. सत्ताधारी पक्षातील आमदार आणि नगरसेवक स्थळपाहणी करून तक्रारी करत असताना मित्रपक्ष मात्र या अनधिकृत गिरण्यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे युतीधर्म मित्र पक्षाने सुद्धा पाळावा, अशी टीका श्री. केळकर यांनी केली. यावेळी आंदोलनात भाजपा गटनेते, नगरसेवक मुकेश मोकाशी, नगरसेवक सीताराम राणे, नगरसेवक भरत चव्हाण, सुरेश कांबळे, नगरसेविका उषा वाघ आदी उपस्थित होते.