दोनदा शिक्षा भोगलेल्या तस्करासह तिघे जेरबंद
ठाणे : ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत तीन किलो २० ग्रॅम चरस आणि १२,९८४ ट्रामाडॉल कॅप्सुल्ससह तब्बल तीन कोटी तीन लाख ६४,८१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यांत यापूर्वी दोनदा शिक्षा भोगलेल्या आरोपीसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
ठाणे पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार खारीगाव टोलनाका परिसरात सापळा रचण्यात आला. ८ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फिरोज अब्दुल खान (५२) रा. अंकलेश्वर, गुजरात याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून तीन किलो २० ग्रॅम वजनाचा सुमारे तीन कोटी दोन लाख रुपयांचा चरस, एक लाख ४८,५०४ रुपयांच्या १२,९८४ ट्रामाडॉल कॅप्सुल्स, रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या रॅकेटमधील आणखी दोन आरोपींचा शोध घेण्यात आला. मोहम्मद अशरफ गुलाम अहमद शेडा रा. अनंतनाग, जम्मू-काश्मीर याला १९ मे रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर शौकत अजीज मीर उर्फ जुबेर रा. कुपवाडा याला ६ जून रोजी कुपवाडा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात जप्त केलेला चरस जम्मू-काश्मीरमधून आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, या तस्करी साखळीचा अधिक तपास सुरू आहे. आरोपी फिरोज खान याच्याविरोधात यापूर्वी अहमदाबाद आणि जम्मू येथील एनसीबीकडून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले होते. त्या दोन्ही प्रकरणांत त्याला शिक्षा देखील झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई सहपोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली.