‘या’ थुंकीबहाद्दरांचे करायचे तरी काय?

तुमचे महाराष्ट्रात सहर्ष स्वागत आहे. आता एकदा का स्वागत केले की पाहुण्यांचे सर्व वेडेचाळे, त्यांच्या लहरी, त्यांची बेशिस्त, अरेरावी असे सर्वकाही स्वीकारायला हवे. त्यांच्या या सवयींना मोडता घालण्याची असहिष्णुता दाखवणे म्हणजे यजमानपदाला लांच्छन आणण्यासारखे ठरायचे. त्यामुळे पाहुण्यांना सहन करण्याचे आपले संस्कार न विसरणे हेच शहाणपणाचे ठरते. नेमका याचा विसर ठाण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला पडला. त्यांनी ओला टॅक्सीचालकास थुंकण्यावरून
हटकले काय, बिच्चारे हात-पाय मोडून बसले. तुम्ही या घटनेकडे नित्याची सनसनाटी बातमी म्हणून पाहत असाल तर तुमचे शहर डम्पिंग ग्राउंड, तुमचे रस्ते पिकदाणी आणि गल्लीबोळ उकिरडे झालेच असे समजा. त्याबद्दल तुम्ही ‘ब्र’ही काढायचा नाही, कारण तुम्ही तुमचे शहर समस्त थुंकीबहाद्दर आणि कचराबहाद्दरांच्या हवाली केले आहे. आमच्या मार खाणाऱ्या बिच्चाऱ्या काकांना हे वास्तव ठाऊक नसावे हे त्यांचे दुर्दैव!

ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण होत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि मराठी माणसाच्या अस्मितेची पताका घेऊन फिरणाऱ्या समस्त सैनिकांना प्रचंड राग आला. त्यांनी त्यांच्या पद्धतीने थुंकीबहाद्दर चालकास प्रसाद देऊन पोलिसांच्या हवाली केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर खुनाचा प्रयत्न असा गुन्हा नोंदवण्याचा आग्रह पोलीस अधिकाऱ्यांकडे धरला. या शहरात असे आक्षेपार्ह वर्तन सहन केले जाणार नाही, हा संदेश जरूर गेला. परंतु थुंकीबहाद्दरांमध्ये इतके साहस आले कोठून, याचा तपासही करावा लागेल. काकांना वेदना सहन कराव्या लागत आहेत. त्याचे व्रण त्यांच्या मनातून कधीच जाणार नाहीत. म्हणूनच या घटनेकडे राजकारणाच्या पलिकडे जाऊन पाहायला हवे. ही थुंकण्याची सवय असो वा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची वृत्ती असो, ही स्थानिकांमध्येही आहे. या घटनेत ती व्यक्ती परप्रांतीय आहे. आमचे स्पष्ट मत आहे की वरील आक्षेपार्ह वर्तन करण्यासाठी एक परिसंस्था आपण निर्माण केली आहे. कोणी कसेही वागावे हा परवाना या परिसंस्थेने दिला आहे. त्यास प्रशासन तर जबाबदार आहेच, परंतु राज्यकर्तेही त्याबाबत गंभीर नाहीत. परप्रांतीय सारेच कायदे मोडतात असे नाही. परंतु ते आपापल्या भागातील परिसंस्थेने केलेले संस्कार घेऊनच नव्या शहरात येत असतात. अशावेळी या शहरांनी त्यांना जुन्या सवयींना मोडता घालण्याचे वातावरण करायला हवे. परदेशात गेल्यावर आपण कसे बरे एकदम शिस्तबद्ध होऊन जातो? तिथे कोणी तुम्हाला हटकले तर तुम्ही प्रतिकार करता का? हा परप्रांतीय टॅक्सीचालक हात उचलतो, कारण त्याला येथील सिस्टीमची भीतीच वाटणे बंद झाले आहे. हे सर्व विषय राजकारणापलिकडचे आहेत. ते नागरी शास्त्राबद्दल आहेत आणि त्याचे धडे शाळेतच नाही तर शाळेतून बाहेर पडलेल्या मोठ्यांनाही द्यावे लागणार आहेत. ठाण्यातील घटना संतापजनक आहेच, परंतु ज्या काकांना मारहाण झाली, त्यांचा उरलासुरला आत्मसन्मान शाबूत ठेवण्यासाठी ठाणेकरांनी स्वच्छतेची आणि सार्वजनिक शिस्तीची आजच प्रतिज्ञा घ्यायला हवी.

जाता-जाता इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. २०२१ साली आम्ही लिहिलेल्या ‘पेव्हर ब्लॉक’ या कादंबरीत हुबेहूब हा प्रसंग शब्दबद्ध केला होता. हा योगायोग दुर्दैवी आहे असेच आता म्हणावे लागेल.