भाईंदर : भाईंदर पश्चिमेला उत्तन परिसरात जिवंत तोफगोळा सापडला आहे. भाईंदर परिसरात जुन्या काळातील सुरक्षा यंत्रणांचे अवशेष काही ठिकाणी अस्तित्वात असल्याने सदर तोफगोळा त्या काळातील असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उत्तन आणि आसपासचा किनारपट्टीचा भाग ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. यापूर्वीही वसई-विरार आणि मीरा-भाईंदरच्या सागरी पट्ट्यात जुन्या काळातील तोफगोळे किंवा युद्धसामग्री सापडण्याच्या घटना घडल्या आहेत. उत्तन परिसरात जमिनीत गाडलेला एक संशयास्पद धातूचा गोळा आढळल्यानंतर नागरिकांनी उत्तन सागरी पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासणी केली असता स्फोटक सामग्री असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर तत्काळ एनएसजीशी संपर्क साधण्यात आला. घटनेची माहिती मिळताच एनएसजीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तांत्रिक प्रक्रियेद्वारे हा तोफगोळा निकामी करण्यात आला. मीरा-भाईंदर पोलिस आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल यांनी संयुक्त कारवाई करत तो निकामी केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तिला हात लावू नये, असे आवाहन सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना केले आहे.