भिवंडीतील प्रदूषण प्रकरणी १९१ विकासकांना नोटीसा

भिवंडी: भिवंडी शहर गंभीर प्रदूषणाने त्रस्त असताना महापालिकेचे अनेक बांधकाम स्थळांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीक करत आहेत. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १९१ गृहनिर्माण आणि व्यावसायिक बांधकाम प्रकल्पांना महानगरपालिका प्रशासनाने तातडीने नोटिसा बजावल्या असून विकासकांना आवश्यक प्रदूषण नियंत्रण उपाययोजना तत्काळ लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने विकासकांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे कि, सध्या मोठ्या शहरांतील शुध्द वायुचा स्तर खालावत चालला आहे. त्या अनुषंगाने संदर्भित आदेशानुसार मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. अशी अट बांधकाम परवानगी पत्रामध्ये नमूद करण्यांत आलेली आहे. त्यानुसार भिवंडी मनपा क्षेत्रातील वायु प्रदुषणावर नियंत्रण करणेकामी मनपा स्तरावर समिती गठीत करण्यात आलेली आहे. उक्त समिती मुंबई उच्च न्यायालयाने संदर्भित आदेशात दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे अनुपालन होत आहे किंवा नाही याचे अवलोकन करून तसा अहवाल शासन स्तरावरील समितीकडे पाठविणेबाबत कार्यवाही करणार आहे. तथापी बांधकाम परवानगी अटीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार बांधकाम ठिकाणी मार्गदर्शक सुचनांची एक महिन्याच्या आत पुर्तता करण्यात यावी, असे विकासकांना दिलेल्या नोटीसीत नमूद केले आहे.

महापालिका अधिकाऱ्यांच्या मते अनेक बांधकाम स्थळांवर वॉटर फॉगिंग सिस्टीम बसवण्यात आलेली नाही. बांधकाम साहित्य झाकण्यासंबंधीच्या नियमांचे पालन केले जात नाही आणि धूळ नियंत्रणासाठी इतर आवश्यक उपाययोजना लागू करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. भिवंडी शहर आधीच खराब हवेच्या गुणवत्तेने त्रस्त आहे. रस्त्यावरील धूळ, बांधकामाचा मलबा, आणि औद्योगिक युनिट्समधून होणाऱ्या उत्सर्जनामुळे रहिवाशांना श्वसनाचे त्रास होत आहेत.

पहिल्या टप्प्यात, मोठ्या बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या प्रकरणी संयुक्त पथक नियमित तपासणी करत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांना नोटिसा बजावण्यात येत असून, विहित वेळेत सुधारणा न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असे महापालिकेचे उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर यांनी सांगितले.

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात सध्या रस्तारुंदीकरणाचे काम सुरु आहे. त्याचप्रमाणे सिमेंटचे नवीन रस्ते देखील बनविले जात असताना धुळीचे प्रदूषण होत आहे. महापालिकेकडे परवानगी घेतलेल्या इमारतीचे बांधकाम करताना प्रदूषण होऊ नये म्हणून त्यांना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीसा बजावल्या आहेत. मात्र शहरात अनेक ठिकाणी राजरोसपणे आणि सुट्टीच्या दिवसात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणावर तसेच बांधकामावर कारवाई आवश्यक असल्याची मागणी शहरातील विविध भागातील नागरिक करीत आहे.