ट्री आर्मीच्या वृक्षलागवड चळवळीला जॅकी श्रॉफ यांचा पाठिंबा

नवी मुंबई : खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर म्हणजे पिंपळाच्या झाडासारखा सळसळता उत्साह आहे. त्याला वाढविण्याची, जपण्याची आणि पाणी घालण्याची जबाबदारी तुमची-आमची आहे,” अशा हृदयस्पर्शी शब्दांत ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या कार्याचे कौतुक करत ट्री आर्मीच्या वृक्षलागवड चळवळीला भक्कम पाठिंबा दिला.

गार्डी-घानवडच्या माळावर ट्री आर्मी आणि जेके फाउंडेशनच्या माध्यमातून साडेचार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते या लोकचळवळीचा औपचारिक शुभारंभ झाला. कार्यक्रमात बोलताना जॅकी श्रॉफ यांनी आमदार बाबर यांच्या साधेपणा, कार्यतत्परता आणि पर्यावरणावरील प्रेमाचे विशेष कौतुक केले. “फक्त बोलणारे आणि प्रत्यक्ष काम करणारे यांच्यात फरक असतो. सुहास बाबर हे बोलण्याइतकेच कृतीतही प्रामाणिक आहेत,” असे श्रॉफ यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याइतकी झाडे लावण्याचा संकल्प केला असून पुढील दोन वर्षांत ७८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असल्याचे आमदार बाबर यांनी स्पष्ट केले.