कांदळवनाला संरक्षक जाळी; भराव व अतिक्रमणांना आळा

ठाणे: पहाटेच्या धुक्यातून डोकावणाऱ्या खारफुटी आणि खाडीवर विहार करणाऱ्या पक्ष्यांनी नटलेला ठाणे पूर्वेतील मीठबंदर रोड परिसर आता अधिक सुरक्षित झाला आहे. या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पट्ट्यातील खारफुटींचे संरक्षण करण्यासाठी कांदळवन विभागाने लोखंडी संरक्षक जाळी उभारत अनधिकृत भरावाला प्रभावी लगाम घातला आहे. त्यामुळे खाडीकिनाऱ्यावरील जैवविविधतेला संरक्षणाचे कवच मिळाले असून परिसराला नवसंजीवनी मिळाली आहे.

स्वामी समर्थ मठ मार्गालगत काही ठिकाणी माती, राडारोडा आणि कचरा टाकून खाडीकिनारी भराव करण्याचे प्रकार सुरू होते. त्यामुळे खारफुटी, नैसर्गिक जलप्रवाह आणि वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे, हा परिसर सोनेरी कोल्हा, मुंगूस, घोरपड, विविध साप तसेच अनेक पक्षी प्रजातींच्या वावरासाठी ओळखला जातो.

या पार्श्वभूमीवर कांदळवन विभागाने तातडीने पावले उचलत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक जाळी उभारली आहे. त्यामुळे खाडी परिसरात भराव टाकण्यास अटकाव झाला असून खारफुटींना संरक्षणाचे कवच मिळाले आहे.

मीठबंदर परिसरातील खारफुटी केवळ झाडांचा समूह नसून ठाणे खाडीच्या पर्यावरणीय आरोग्याचा आधारस्तंभ आहेत. किनारी धूप रोखणे, कार्बन शोषून घेणे, जलचरांना अधिवास उपलब्ध करून देणे आणि पूरस्थितीचा प्रभाव कमी करणे अशा अनेक महत्त्वाच्या भूमिका त्या बजावतात.

मीठबंदर परिसरातील खारफुटी संवर्धनासाठी कांदळवन विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या भागात यापूर्वी लावण्यात आलेली खारफुटी आता जोमाने वाढत असून स्थानिक जैवविविधतेला त्याचा लाभ होत आहे. खारफुटींना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी संरक्षक उपाययोजना करण्यात आल्या असून भविष्यातही या परिसंस्थेचे संरक्षण आणि संवर्धन प्राधान्याने केले जाईल, असे कांदळवन वनपरिक्षेत्र अधिकारी मनीष पवार यांनी सांगितले.