ठाण्यात जल्लोष
ठाणे: ठाणे-पालघर स्थानिक संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र फाटक बिनविरोध निवडून आल्यानंतर शुक्रवारी टेंभीनाका येथील आनंद आश्रमात जल्लोष करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सार्वत्रिक निवडणूक – २०२६ मध्ये ठाणे मतदारसंघातून रवींद्र फाटक तर यवतमाळ मतदारसंघातून दुष्यंत चतुर्वेदी हे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि आरपीआय या महायुतीचे उमेदवार म्हणून बिनविरोध विजयी झाले.
या विजयानंतर आज ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदआश्रमात उपस्थित राहून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्या प्रतिमेला गुलाल लावला. यानंतर या दोन्ही विजयी उमेदवारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व शिवसैनिकांनी विजयी जल्लोष केला.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जलसंधारण मंत्री संजय राठोड, ठाणे महानगर पालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना ठामपा सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे तसेच महायुतीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवंगत वसंत डावखरे यांना बिनविरोध निवडून देण्याचे काम आम्ही केले होते. या निवडणुकीत शिवसेनेचे दोन,राष्ट्रवादी काँग्रेस दोन आणि भाजपचे दोन असे सहा बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. ही पुढच्या विजयाची नांदी असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.