सुर्वे, पवार आणि ढसाळांच्या कवितांनी रसिक न्हाले
ठाणेः मराठी साहित्यातील क्रांतीचा हुंकार आणि शोषितांच्या वेदनांना वाचा फोडणाऱ्या कवितांचा स्वर ३ जून रोजी ठाण्यातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात घुमला. निमित्त होते, पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान आयोजित ‘चावडी’ या विशेष काव्य-कार्यक्रमाचे.
ज्येष्ठ साहित्यिका प्रज्ञा पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सोहळ्याने ठाणेकर रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिका प्रज्ञा पवार यांच्या प्रास्ताविकाने झाली. दया पवार यांच्या लेखनाचा वारसा आणि त्यांच्या कार्याचा उद्देश विशद करताना त्यांनी, ‘दया पवार यांनी आयुष्यभर लेखनातून समाजाचा जागर केला,’ असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी सादर केलेल्या ‘कोंडवाडा’ या कवितेने सभागृहात शांतता पसरली. नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे आणि दया पवार हे मराठी काव्यप्रवाहाचे खरे मापदंड असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
लोकशाहीर संभाजी भगत यांनी दया पवार यांच्या ‘बाई मी धरण बांधते’ या गाण्याने कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली. पुढे ‘डोंगरी शेत माझं ग’ सादर करून त्यांनी रसिकांची दाद मिळवली. मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी ‘कार्ल मार्क्स’ ही कविता सादर करत सुर्वेंच्या कविता कशा ‘माणुसकेंद्री’ आहेत, याचे प्रभावी दर्शन घडवले. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता हेमंत ढोमे यांनी ‘बिगारी नाका’ आणि ‘कृष्ण केशव दामले’ या कवितांमधून श्रमिकांचे विश्व मांडले. अभ्यासक कैलास वाघमारे यांनी ‘गिरणीची लावणी’ सादर करत गिरणी कामगारांच्या आयुष्यातील दाहकता जिवंत केली.
प्रसिद्ध मराठी कवयित्री नीरजा यांनी ‘नेहमीच्या घिसापिट्या प्रतिमा बाजूला सारून सुर्वेंना चंद्र लहान मुलाच्या रूपात दिसला’ असे सांगत त्यांनी ‘चंद्रासाठी चार हिताच्या गोष्टी’ ही कविता सादर केली.
प्रज्ञा पवार यांनी नारायण सुर्वे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, सुर्वेंनी केवळ १४५ कविता लिहिल्या, पण त्यातून एक मोठे युग निर्माण झाले. मराठी कवितेची कोंडी फोडण्याचे काम सुर्वेंच्या कवितांनी केले. यावेळी अक्षय शिंपी यांनी ‘सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे’ ही कविता सादर केली, तर दीपक राजाध्यक्ष यांनी ‘कविता आणि मी’ मधील काही वेचक अंश मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक युवराज मोहिते यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप सर्वांनी मिळून सादर केलेल्या ‘पोस्टर’ या कवितेने झाला.