नुतनीकरणाचा खर्च वाढला; भेदीले रंगायतन मंडळा!

२३ कोटींची तरतूद, खर्च मात्र ३८ कोटी

ठाणे: निधी खर्च करताना काटकसर करावी, शिस्त राखावी, असे खुद्द आयुक्तांचे निर्देश असले तरी राम गणेश गडकरी रंगायतनच्या नुतनीकरणासाठी राज्य शासनाकडून २३ कोटींची तरतूद असताना कंत्राटदाराने ३८ कोटींचा खर्च केला आहे. त्यामुळे बिकट परिस्थिती असतानाही ठाणे महापालिकेच्या खांद्यावर वाढलेल्या १५ कोटींच्या खर्चाचे ओझे आले आहे.

राज्य शासनाने रंगायतनच्या नूतनीकरणासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र काम पूर्णत्वाकडे जात असताना खर्चात मोठी वाढ झाली. या वाढीव खर्चास मान्यता देण्यासाठी महापालिकेने कलम ७२(ब) अंतर्गत प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नूतनीकरणाच्या कामांमध्ये नवीन आसनव्यवस्था, रंगमंचाचे आधुनिकीकरण, अग्निसुरक्षा व्यवस्था, सजावटीचे छत, सराव कक्ष, वाहनतळाची सुविधा तसेच स्वच्छतागृहांचे नूतनीकरण यांचा समावेश करण्यात आला. या सुविधांमुळे रंगायतन अधिक सुसज्ज झाले असले तरी खर्चात सुमारे ६५ टक्क्यांनी वाढ झाल्याने आर्थिक नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

मंजूर निधीपेक्षा अधिक झालेला खर्च स्थानिक स्वराज्य संस्थेलाच करावा लागणार असल्याने हा आर्थिक भार महापालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. पालिकेवर आधीच विविध विकासकामे, कंत्राटदारांची देणी आणि अन्य आर्थिक जबाबदाऱ्यांचा ताण असताना आता आणखी १५ कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त आणि खर्च नियंत्रणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रंगायतनचे नूतनीकरण पूर्ण झाले असून ऑगस्ट २०२५ पासून ते नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहे. आधुनिक सुविधांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाले असले तरी वाढीव खर्चाची रक्कम, कंत्राटदारांची देयके आणि निधी व्यवस्थापन याबाबतचे प्रश्न अद्याप कायम आहेत. प्रशासनाने वाढीव कामांची बिले टप्प्याटप्प्याने अदा करण्याचे नियोजन केल्याचे सांगितले आहे.