रेल्वे मैदान वाचवण्यासाठी शिवसेना-भाजपाचे आंदोलन

बांधकाम कामाला तात्पुरती स्थगिती
कल्याण: डोंबिवली पश्चिमेतील प्रमुख क्रीडांगणांपैकी एक असलेल्या रेल्वे मैदानावर रेल्वेकडून प्रस्तावित बांधकामाच्या विरोधात शिवसेना, भारतीय जनता पक्षाने रविवारी जोरदार आंदोलन छेडले. स्थानिक खेळाडू, युवक आणि नागरिकांसह शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांनी मैदानावर आंदोलन करत रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर केले.
येथील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या म्हणण्यानुसार रेल्वे मैदान हे डोंबिवलीतील हजारो मुला-मुलींसाठी खेळ व सरावाचे महत्त्वाचे केंद्र आहे. भारतीय क्रिकेटपटू अंजिक्य रहाणे यांच्यासारखे नामवंत खेळाडूही या मैदानावर खेळले असल्याचा दावा करण्यात आला. या मैदानावर बांधकाम केल्यास खेळाडूंसाठी उपलब्ध जागा कमी होऊन त्यांच्या सरावावर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली.
आंदोलनादरम्यान शिवसेना भाजप नेते व कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होईपर्यंत बांधकाम तत्काळ थांबविण्याची मागणी केली. मैदानाचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. याठिकाणी उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भूमिका ऐकून घेतली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होईपर्यंत सध्या बांधकामाचे काम स्थगित ठेवण्यास सहमती दर्शवली. तसेच निवेदन वरिष्ठ स्तरावर पाठवून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
या आंदोलनात शिवसेना भाजपचे अनेक नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि स्थानिक खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रेल्वे प्रशासनाने मैदानाच्या संरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करत डोंबिवलीतील खेळाडूंना न्याय मिळेल आणि हे ऐतिहासिक मैदान सुरक्षित राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.