वन विभागाची थरारक मोहीम यशस्वी
ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली वनपरिक्षेत्रातील येऊर नियंत्रण क्षेत्रात जखमी अवस्थेत झाडावर बसलेल्या बिबट्याची वन विभागाने थरारक बचावमोहीम राबवत यशस्वी सुटका केली. गंभीर जखमी आणि अशक्त झालेल्या या बिबट्याला सुरक्षितपणे पकडून उपचारासाठी बिबट्या बचाव केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
पाचपाखाडी (इंदिरानगर) राखीव वन क्षेत्रातील सर्व्हे क्रमांक ५२० मध्ये ३० मे रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता एका झाडावर जखमी बिबट्या बसल्याचे वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच वन विभाग, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ, डब्ल्यूडब्ल्यूए आणि आरएडब्ल्यूडब्ल्यूए संस्थांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या गंभीर जखमी असल्याने त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्याचे दिसून आले.
रात्रीच्या अंधारात बचावकार्य धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने वन विभागाने संपूर्ण रात्र परिसरावर कडेकोट नजर ठेवली. अखेर रविवारी सकाळी सहा वाजता शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी बिबट्या मूळ ठिकाणापासून सुमारे ७० ते ८० मीटर अंतर चालत जाऊन झाडीत पडल्याचे आढळले. वन्यजीव अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि बचाव पथकाच्या उपस्थितीत बिबट्याला सुरक्षितपणे भूल देऊन जेरबंद करण्यात आले.
उपचारासाठी या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली येथील बिबट्या बचाव केंद्रात हलविण्यात आले असून त्याच्यावर तज्ज्ञ पशुवैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. वन विभाग, बचाव पथक आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयामुळे एका वन्यजीवाचा जीव वाचविण्यात यश आल्याने या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
बिबट्याच्या शरीरावरील जखमा गंभीर स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे त्याला सुरक्षितपणे पकडून तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक होते. बचाव पथकाच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी झाली असून बिबट्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांनी दिली.
चौकट
प्राथमिक तपासणीत बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या चारही पायांच्या तळव्यांना गंभीर जखमा असून मागील पायावरील मोठ्या जखमेमुळे हाड उघडे पडल्याचे दिसून आले. तसेच शरीरावर अनेक ओरखडे आणि जखमांचे व्रणही आढळले.