पावसाचीही आंदोलनाला साथ
शहापूर: शहापूर तालुक्यातील वाढते तापमान, वृक्षतोड, डोंगर उत्खनन आणि पर्यावरणाच्या होत असलेल्या ऱ्हासाविरोधात शहापूर पर्यावरण संरक्षण मंचने आयोजित केलेल्या भव्य मानवी साखळी आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे आंदोलन सुरू असतानाच पावसाने लावलेली हजेरी ही उपस्थितांचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
शहापूर पर्यावरण संरक्षण मंचच्या पुढाकाराने आयोजित या आंदोलनात तालुक्यातील डॉक्टर, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी तसेच विविध क्षेत्रातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी हातात हात घालून मानवी साखळी तयार करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहापूर तालुक्यात वाढत्या वृक्षतोडीमुळे निर्माण होणारे तापमानवाढीचे संकट, जलस्रोतांवर होणारा परिणाम आणि भविष्यातील पर्यावरणीय आव्हानांबाबत चिंता व्यक्त केली. तालुक्याचा पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसाच्या सरी सुरू असतांनाही नागरिकांनी मानवी साखळी कायम ठेवत आपली पर्यावरणाबाबतची बांधिलकी दाखवून दिली. त्यामुळे हे आंदोलन अधिक लक्षवेधी ठरले.पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी एकत्र येऊन दिलेला हा संदेश प्रशासनासाठीही महत्त्वाचा इशारा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
शहापूर पर्यावरण संरक्षण मंचच्या मानवी साखळी आंदोलनात डॉ.राजेश वेखंडे यांनी आपल्या अनोख्या सहभागातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांनी सायकलवर येत प्रदूषणमुक्त वाहतुकीचा संदेश दिला. तसेच प्रतिकात्मक ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करून, आज वृक्षतोड आणि पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे भविष्यात शुद्ध हवेची टंचाई निर्माण होऊ शकते, हा प्रभावी संदेश दिला.
यावेळी संतोष शिंदे, कमलेश कुंदर, बबन हरणे, अरुण कासार, डी.के.विशे, मनोहर मडके, अरुण मडके, गुरुनाथ तिवरे, विजय देशमुख, माधव भेरे यांसह नगरसेविका रजनी शिंदे, कामिनी सावंत तसेच असंख्य महिला भानिनींसह शहापूरकर उपस्थित होते. यावेळी शहापूर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.