एकीकडे राजकीय बातम्यांचा भडिमार, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, कमालीचा दांभिकपणा, बेसुमार खोटारडेपणा आणि आंदोलनांची न संपणारी खुमखुमी यांनी राजकीय अवकाश पूर्णपणे काळवंडून गेले असताना शहापूर तालुक्यातील सरलांबे गावात एका शिबिरास भेट देण्याचा योग आला आणि आशेची किरणे अनुभवल्याचा आनंद झाला. ठाण्यातील विद्यादान सहाय्यक मंडळातर्फे आयोजित केलेल्या या उपक्रमात तरुणांना करिअर व्यतिरिक्त समाज, पर्यावरण आणि शाश्वत विकासाची जाणीव या शिबिरातून करुन देण्यात आली. तरुणांमधील सळसळता उत्साह, त्यांची ऊर्जा, नवनवीन संकल्पनांची मांडणी, व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजना असे सहभागाचे ओतप्रोत दर्शन आम्हाला घडले. प्रदूषित झालेल्या दैनंदिन समाज आणि राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ही खचितच दिलासा देणारी सुखद अनुभूती होती. त्याबद्दल विद्यादान सहाय्यक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
या शिबिरातील वैभव सोनोने या उपेक्षित समाजातील तरुणाची भूमिका महत्वाची होती. गेली काही वर्षे तो विद्यादान सहाय्यक मंडळाशी जोडला गेला आहे आणि शहापूरच्या शिबिराची रुपरेषा, तेथे झालेल्या विविध ॲक्टीव्हीटीज् आणि त्यातून झालेले विचारमंथन याचा वैभव सूत्रधार होता. त्याच्या प्रयोगशिलतेबद्दल लिहिण्यापूर्वी ‘विसमं’ची थोडी ओळख होणे प्रस्तुत होईल. संस्थेने गेली अनेक वर्षे शिक्षणापासून कोणी होतकरु तरूण वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केले आणि आपल्या ‘कार्यकर्ते पालक‘ जाळ्याच्या माध्यमातून सुमारे १५०० तरुणांची त्यांची शैक्षणिक स्वप्ने पूर्ण करण्यात मदत केली. त्यात ग्रामीण भागात दुर्गम खेडोपाडी राहणाऱ्या मुला-मुलींचा सहभाग आहे. शेतमजुरांची मुले, हलाखीची स्थिती असलेली मुले, झोपडपट्ट्यांत आणि सर्व सुविधांपासून दूर राहणारी मुले या योजनेचे लाभार्थी होऊ शकले. त्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे जीवन घडवण्याचे काम ‘विसमं’ने सचोटीने केले. या पार्श्वभूमीवरुन या नि:स्वार्थ संस्थेच्या कार्याचा आवाका लक्षात यावा.
शहापूरच्या तीन दिवसीय शिबिरात वैभव सोनोने यांने समन्वयकाची भूमिका पार पाडली. वास्तववादी शिक्षण: पुस्तकी ज्ञान आणि वास्तव जीवन, युवा आणि समाजकारण, शाश्वत शेती आणि राष्ट्रनिर्माण यांसारख्या विषयावंर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. अनुभवांची देवाण-घेवाण हा या शिबीराचा महत्त्वाचा भाग होता. उदाहरणार्थ अमरावतीच्या प्रियंका बेलसरेला लातुरच्या चैतन्य इंगळेशी संवाद साधता आला तर शहापूरमधील स्थानिक मुला-मुलींना गडचिरोली-नाशिक, बीड ते अगदी कोकणातील राजापूरमधील शिबिरार्थींशी चर्चा करता आली. राज्यातील विविध प्रांतातील ही मुले आपले अनुभव विश्व, चालीरीती, विचारसरणी अशा वैविध्यपूर्ण गुणवैशिष्ट्यांनी या शिबिरात एकमेकांशी संवाद साधताना पाहून गंमत वाटली. वैभवने घेतलेला एक उपक्रम तर विलक्षणच होता. त्याने मुलांना समाजातील विविध व्यक्तीमत्वांमध्ये परकाया प्रवेश करायला लावून त्यांच्यासमोर प्रश्न ठेवले. या प्रश्नांची उत्तरे त्या व्यक्तीमत्वाच्या दृष्टीने विचारात घेऊन उत्तरे द्यायची होती. ‘हो‘ असेल तर एक पाऊल पुढे जायचे आणि ‘नाही‘ असेल तर एक पाऊल मागे. या खेळांनंतर मुलांनी आपल्या कृतीबाबतचे विश्लेषण केले ते या मुलांमधील प्रगल्भता आणि सुक्ष्म विचाराची झलक दाखवणारे होते! ‘विसमं‘ केवळ शैक्षणिक सक्षमता वाढवण्याचे काम करीत नसून मुलांचे सामाजिक भान, त्यांच्यातील संवेदनशीलता आणि माणूसपण जपण्याचे काम करते असे या प्रयोगातून अधोरेखित झाले.
या शिबिरातला आणखी एक उद्बोधक भाग असा होता की, मुलांनी सरलांबे गावातील रहिवाशांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारायच्या. त्यातून रहिवाशांचे राहणीमान, त्यांच्यापुढील आव्हाने, त्यांची जीवनशैली, गावाची एकूण सामाजिक आणि सांस्कृतिक ठेवण, त्याचे सण-वार, रीती-रिवाज, अशी माहिती मुलांनी गोळा केली आणि आपले अनुभव सादर केले. गावकऱ्यांनी केलेला पाहुणचार आणि प्रेमाचा ओलावा यामुळे मुले पुरती भारावलेली दिसत होती. गावकऱ्यांनी या पोरांकडे आपले मन मोकळे केले. त्यातून या मुलांना सामाजिक समस्यांचा उलगडा झाला. त्यावर उपाय शोधण्याची संधी मिळाली. थोडक्यात शिक्षणाबरोबर माणुसकीचे धडे गिरवून घेतले जात होते. राजकारण आणि नीतीमत्तेचा पूर्ण ऱ्हास होत असताना त्रस्त झालेल्या समाजासाठी हे नक्कीच आशेचे किरण आहेत. त्याबद्दल विद्यादान सहाय्यक मंडळाचे कौतुकच वाटले.