रवींद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
ठाणे: आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून पहिल्या फेरीत ठाणे हे शिवसेनेला सोडण्यात आल्याने माजी आमदार रविंद्र फाटक यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात आतापर्यंत १६ जागांवर चर्चा पूर्ण झाली असून छत्रपती संभाजीनगर, जालना विधान परिषदेच्या जागेवर अजूनही तिढा कायम आहे. या दोन्ही जागांसाठी भाजप आणि शिवसेना अडून बसले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आकडेवारी पाहता 14 ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. मात्र, भाजपने आपल्या मित्रपक्षांना काही जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. आतापर्यंत 16 जागांची चर्चा पूर्ण झाली आहे त्यामध्ये भाजप 10, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा लढवण्याची शक्यता आहे. त्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, यवतमाळ, नाशिक, परभणी या चार जागा येण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि कोकणची जागा मिळू शकते, असा अंदाज आहे. उर्वरित सर्व जागांवर भाजप लढणार असल्याचे दिसत आहे. यामध्ये नागपूर, अहिल्यानागर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा-गडचिरोली-चंद्रूपर, भंडारा-गोंदिया, सातारा-सांगली या जागांचा समावेश आहे.
माजी आमदार रवींद्र फाटक हे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय विश्वासातील नेते आहेत. त्यांना यापूर्वी ठाणे लोकसभा मतदार संघाची उमेदवाऱी मिळण्याची शक्यता होती, परंतु त्यावेळी नरेश म्हस्के यांना उमेदवाऱी देण्यात आली. त्यांनी नाराजी व्यक्त न करता पक्षाचा आदेश मान्य केला होता. विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देखील त्यांनी पक्षाचा आदेश मान्य केला होता, त्यामुळे श्री. फाटक यांना ठाण्याच्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देऊन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे हे निष्ठेचे फळ देतील अशी चर्चा सध्या शिवसैनिकांमध्ये व्यक्त होत आहे. येत्या एक-दोन दिवसात त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.