विधानपरिषदेसाठी मविआचे जागावाटप ठरले

मुंबई: विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या आमदारांच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. महाविकास आघाडीने 17 जागांसाठीचे जागावाटप निश्चित केले आहे.

महाविकास आघाडीने विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होऊ न देता सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आठ ठाकरेंची शिवसेना सहा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी तीन जागा लढवणार आहे.

सोलापूरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप, अहिल्यानगरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप, ठाणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) विरुद्ध शिवेसना, जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप, सांगली-सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) विरुद्ध भाजप, नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप, यवतमाळमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, भंडारा-गोंदियामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप, अमरावतीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप, धाराशिव-लातूर-बीडमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप, परभणी-हिंगोलीमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना, नागपूर (पोटनिवडणूक)मध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप, छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप किंवा शिवसेना अशी लढत होऊ शकते.

भाजप आणि काँग्रेस सोलापूर, अहिल्यानगर, भंडारा गोंदिया, वर्धा-गडचिरोली- चंद्रूपर, नागपूरमध्ये आमने सामने येतील. भाजप आणि ठाकरेंची शिवेसना जळगाव, नांदेडमध्ये आमने सामने येतील. तर, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सातारा सांगली मतदारसंघात असतील.

ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना नाशिक आणि परभणी हिंगोलीत आमने सामने येतील. याशिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध कोण असेल हे स्पष्ट झालेलं नाही.