अवघ्या ३३ दिवसांत १६ सर्वोच्च शिखरे सर

११ वर्षीय ग्रिहिथा विचारेची ऐतिहासिक कामगिरी

ठाणे, महाराष्ट्रातील ११ वर्षीय भारताची युवा गिर्यारोहक कुमारी ग्रिहिथा विचारे हिने ‘मिशन इंडिया समिट-१६ राज्ये, १६ शिखरे’ या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी मोहिमेद्वारे अवघ्या ३३ दिवसांत भारतातील १६ राज्यांमधील १६ सर्वोच्च शिखरे यशस्वीरित्या सर करून एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे.

ग्रिहिथा आपल्या अल्पवयात केलेल्या साहसी आणि पर्वतारोहण क्षेत्रातील असामान्य कामगिरीमुळे देशाचा अभिमान वाढवत आहे. गेल्या चार वर्षांपासून ती सातत्याने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्वत मोहिमा पूर्ण करत असून, तिच्या जिद्द, चिकाटी आणि धाडसामुळे ती आज युवा पिढीसाठी प्रेरणास्थान बनली आहे.

ही ऐतिहासिक मोहीम २३ एप्रिल रोजी मुंबई, महाराष्ट्र येथून सुरू झाली आणि २५ मे रोजी गुजरातमध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाली. या संपूर्ण मोहिमेदरम्यान ग्रिहिथाने बेटी बचाओ, बेटी पढाओ हा सामाजिक संदेश देशभर प्रभावीपणे पोहोचवत महिला शिक्षण आणि महिला सशक्तीकरणासाठी जनजागृती केली.

फक्त ३३ दिवसांच्या कालावधीत ग्रिहिथाने १६ भारतीय राज्यांमधून प्रवास केला १५ वेळा विमानाने प्रवास केला. ९,१४१ कि.मी. प्रवास विमानाने, ५,४८० कि.मी. प्रवास रस्त्याने, ६१८ कि.मी. प्रवास रेल्वेने केला. प्रवास केला. या काळात १३० कि.मी. पायी ट्रेकिंग आणि चढाई केली

ग्रिहिथाने ३३ दिवसांत २४ एप्रिल रोजी कळसुबाई (महाराष्ट्र, 1,646 मी.), २६ एप्रिल रोजी सोंसोर्गोर (गोवा), २८ एप्रिल रोजी मुल्लायनगिरी (कर्नाटक, 1,930 मी.), ३० एप्रिल रोजी मीसापुलिमला (केरळ, 2,640 मी.), २ मे रोजी डोड्डाबेट्टा (तामिळनाडू, 2,537 मी.), ४ मे रोजी पातळ टोका (तेलंगणा, 826 मी.), ६ मे रोजी देओमाली (ओडिशा, 1,672 मी.), ८ मे रोजी गौरलता (छत्तीसगड, 1,225 मी.), १० मे रोजी परसनाथ (झारखंड, 1,365 मी.), १४ मे रोजी संडकफू (पश्चिम बंगाल, 3,636 मी.), १७ मे रोजी तुमजांग शिखर (आसाम, 1,860 मी.), १९ मे रोजी करोह शिखर (हरियाणा, 1,467 मी.), २० मे रोजी पंजाबमधील सर्वोच्च शिखर (1,000 मी.), २१ मे रोजी गुरु शिखर (राजस्थान, 1,722 मी.), २३ मे रोजी धुपगड (मध्य प्रदेश, 1,352 मी.) आणि २५ मे रोजी गुजरातमधील 1117 मीटर उंचीचे गिरनार सर केले.

संपूर्ण मोहिमेदरम्यान ग्रिहिथाने प्रत्येक शिखरावर “बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ”चा संदेश असलेले बॅनर फडकावत मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणि महिला सशक्तीकरणाबाबत जनजागृती केली. तिच्या या मोहिमेने देशभरातील नागरिकांना मुलींना शिक्षण, संधी आणि पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
“सशक्त मुलगी म्हणजे सक्षम राष्ट्र” हा संदेश तिने आपल्या साहसी प्रवासातून प्रभावीपणे पोहोचवला.

या मोहिमेपूर्वीही ग्रिहिथाने केदारकंठ (उत्तराखंड), माउंट युनाम (हिमाचल प्रदेश) आदी आव्हानात्मक शिखरे सर केली आहेत. या कामगिरीमुळे ग्रिहिथाने आता भारतातील १८ राज्यांमध्ये पर्वतारोहण आणि ट्रेकिंग मोहिमा पूर्ण केल्या आहेत.
एवढ्या कमी वयात हा टप्पा गाठणाऱ्या भारतातील ती सर्वात युवा महिला पर्वतारोहक ठरली आहे.

“मिशन इंडिया समिट-१६ राज्ये, १६ शिखरे” या मोहिमेला नॅशनल असोसिएशन ऑफ रिअलटर्स इंडिया यांचे प्रायोजकत्व लाभले. या मोहिमेचा ध्वज फडकावण्याचा समारंभ २२ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते, छायाचित्रकार आणि प्रेरणादायी वक्ते बोमन इराणी प्रमुख उपस्थित होते. तसेच ‘एनएआर इंडिया’चे विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.