भिवंडीतील स्व. मीनाताई ठाकरे रंगायतनमध्ये तिसरी घंटा कधी?

कोट्यवधी रुपये खर्चूनही पडदा उघडेना

भिवंडी: ठाणे जिल्ह्यातील प्रशस्त नाट्यगृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन दुरुस्तीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत या नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम करण्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारास अपयश आले आहे.

भिवंडी शहरातील बाजारपेठ ठाणगेआळी या मध्यवर्ती भागात स्व.मीनाताई ठाकरे रंगायतन आहे. हे नाट्यगृह दुरुस्तीच्या नावाखाली सात वर्षांपासून बंद आहे. नाट्यगृह तातडीने सुरू करा, या मागणीसाठी शहरातील मान्यवरांनी लेखी निवेदन दिल्याने शहरातील स्व. मीनाताई ठाकरे रंगायतनच्या दुरुस्तीच्या कामाची आयुक्त सागर यांनी गत महिन्यात पाहणी केली. दुरूस्तीचे काम संथगतीने सुरू असल्याने नाट्यगृहाची दुरावस्था झाली आहे, असे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यांनी नाट्यगृहाच्या दुरुस्तीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत तातडीने काम करण्याचे आदेश पालिका महाप्रशासन व ठेकेदाराला दिले आहेत. मात्र तरीही या नाट्यगृहाकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे.

नाट्य रसिकांच्या आग्रहाखातर भिवंडी नगर परिषदेने १९९६ साली शहरातील ठाणगे आळी या भागात नाट्यगृहाची उभारणी करून त्यास स्व.मीनाताई ठाकरे रंगायतन असे नांव दिले आहे. काही वर्षे या नाट्यगृहात ऑर्केस्ट्रा व मराठी, हिंदी, गुजराती अशा विविध भाषांतील नाट्यप्रयोग झाले. स्थानिक कार्यक्रमही या नाट्यगृहात होत असताना गेल्या आठ वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली पालिका प्रशासनाने हे नाट्यगृह बंद केले आहे. तातडीने दुरुस्ती काम करून हे नाट्यगृह सुरू करण्यात यावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटना, संस्था, राजकीय पक्ष, नाट्य रसिकांनी केली, मात्र महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हे नाट्यगृह बंद अवस्थेत आहे.

दरम्यान दुरूस्तीसाठी पैसे नाहीत, असे वारंवार सांगणाऱ्या महापालिका प्रशासनाला दुरूस्तीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ कोटींचा निधी मंजूर करून त्यापैकी पाच कोटींचा निधी महापालिकेला दिला आहे. या निधीतून जलरोधक कामे, नळकाम, प्रेक्षागृहातील प्रकाश यंत्रणा, ध्वनीव्यवस्था, हवा पडदा, वातानुकूलन व्यवस्था, रंगमंच दुरुस्ती, छतावरील उद्यान, रंगकाम, विशेष मान्यवर कक्षातील पडदे बदलणे तसेच स्वच्छतागृहांची सुधारणा, अशी कामे करण्याचे नियोजन होते. मात्र संबंधित ठेकेदाराने अतिशय संथगतीने व तकलादू पद्धतीने काम केल्याच्या आलेल्या तक्रारीवरून महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी नाट्यगृहाची पाहणी केली. त्यानंतर संथगती कामाबद्दल नाराजी व्यक्त करीत गेल्या महिन्यात कंत्राटदारास १० दिवसांची मुदत दिली. कामात प्रगती न झाल्यास कार्यादेश रद्द करण्यात येईल, अशी ताकीद दिली आहे. मात्र तरीही राजकीय वरदहस्तामुळे नाट्यगृहाचे दुरुस्तीचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सखोल चौकशी करून कंत्राटदार व महापालिका आयुक्त, प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरातील नाट्यप्रेमी व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सिद्दिक फक्की यांच्यावतीने करण्यात आली आहे.