मोरबे धरणात फक्त १९ टक्के पाणी शिल्लक

सोमवारपासून नवी मुंबईकरांना पाणी कपातीचा चटका

नवी मुंबई: मोरबे धरणातील जलसाठ्यात सातत्याने घट होत असून सध्या फक्त १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच संभाव्य कमी पर्जन्यमानाचा अंदाज लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने सोमवार, २५ मे पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवार पासून विभागवार आठवड्यातील दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मोरबे धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १९०.८९० दशलक्ष घनमीटर इतकी असून सध्या केवळ ३६.४७० दशलक्ष घनमीटर म्हणजेच १९.११ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. भारतीय हवामान खात्याने “एल-निनो” आणि “आयओडी” परिस्थितीमुळे यंदा मान्सून कमी राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या क्षेत्राला मोरबे धरणासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ च्या बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या उपलब्ध जलसाठ्यावर नियमित आणि नियोजनपूर्वक पाणीपुरवठा सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही मनपाकडून सांगण्यात आले. दरम्यान, वाढते तापमान आणि त्यातून होणारे पाण्याचे बाष्पीभवन लक्षात घेता जलसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. याच पार्श्वभूमीवर आठवड्यातून दोन दिवस संबंधित विभागांमध्ये संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

बेलापूर विभागात सोमवार व गुरुवार, नेरुळमध्ये मंगळवार व शनिवार, तुर्भेमध्ये बुधवार व रविवार, वाशीमध्ये गुरुवार व सोमवार, कोपरखैरणेमध्ये मंगळवार व शनिवार, घणसोलीमध्ये बुधवार व रविवार, ऐरोलीमध्ये शुक्रवार, दिघा भागात म.औ.वि. महामंडळाच्या शटडाऊन वेळापत्रकानुसार तसेच सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे येथे मोरबे धरणातून होणारा पाणीपुरवठा दर शुक्रवारी पूर्णपणे बंद राहणार आहे.

महानगरपालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठा टिकवून ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.