ठाणे काँग्रेसचा गंभीर आरोप
ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या मालकीच्या गावदेवी मार्केट इमारतीतील गंभीर सुरक्षात्रुटींबाबत वारंवार लेखी इशारे देऊनही प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केल्यानेच आजची दुर्घटना घडल्याचा संतप्त आरोप ठाणे काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केला आहे. या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.
राहुल पिंगळे यांनी यापूर्वी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन गावदेवी मार्केट इमारतीतील धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधले होते. इमारतीत अनधिकृत बांधकामे, अडथळायुक्त जिने, रॅम्पवरील अतिक्रमणे, अपुरी अग्निसुरक्षा व्यवस्था तसेच ओसी आणि अंतिम फायर एनओसी नसल्यामुळे भविष्यात मोठा अपघात किंवा जीवितहानी होऊ शकते, असा स्पष्ट इशारा त्यांनी पत्राद्वारे दिला होता.
यानंतर अग्निशमन विभागाने पाहणी करून अहवाल तयार केला. मात्र त्यानंतरही ना अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली, ना फायर सेफ्टीच्या दृष्टीने आवश्यक पूर्तता करण्यात आली, ना इमारतीच्या ओसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळेच नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या इमारतीत दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असताना सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ही दुर्घटना नैसर्गिक नसून प्रशासनाच्या हलगर्जीपणातून घडलेली असल्याचा गंभीर आरोप राहुल पिंगळे यांनी केला आहे.