नागरिकांची वहिवाट रोखण्याचा बिल्डरचा प्रयत्न उधळला

मनोज प्रधान यांच्या मध्यस्थीमुळे संजय गांधी अभयारण्यातील मॉर्निंग वॉकचा मार्ग खुला

ठाणे : प्रभाग क्र. ४ टिकूजिनीवाडी परिसरात सुरू असलेल्या बांधकामामुळे नागरिकांची मॉर्निंग वॉकसाठीची वहिवाट बंद करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केल्यानंतर संबंधितांनी मार्ग खुला केला.

टिकूजीनीवाडी रोड परिसरातील निसर्ग परिचय केंद्राजवळील भूखंडावर सुरू असलेल्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची वहिवाट रोखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पायथ्याशी असलेल्या वनविभागाच्या जागेबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२६ मध्ये दयाभाई अँड कंपनीच्या दाव्याला पाठबळ देणारा निकाल दिला होता. मात्र, या निर्णयाविरोधात वनविभागाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर २७ एप्रिल २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली आहे.

असे असतानाही संबंधितांकडून बांधकाम सुरू ठेवत पत्रे लावून नागरिकांचा मॉर्निंग वॉकचा मार्ग बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी मनोज प्रधान यांच्याशी संपर्क साधला.

मनोज प्रधान यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत संबंधितांशी चर्चा केली. मार्ग तातडीने खुला न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधितांनी नागरिकांसाठीची वहिवाट मोकळी केली.

दरम्यान, संबंधित बिल्डरकडून बांधकामास कोणतीही स्थगिती नसल्याचा दावा करण्यात येत असून न्यायालयीन आदेशांची पडताळणी करून पुढील भूमिका निश्चित करण्यात येईल, असे मनोज प्रधान यांनी सांगितले.