पाण्याची पातळी घटल्याने गाळ-शेवाळ वाढले; मासुंदा परिसरात नागरिक त्रस्त
ठाणे : शहरातील मासुंदासह विविध तलावांमधून सध्या तीव्र दुर्गंधी येत असून नागरिक आणि पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे तलावांतील पाण्याची पातळी अडीच ते तीन फुटांनी घटली असून गाळ व शेवाळ वाढल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
मासुंदा, उपवन, ब्रह्माळा, जेल तलाव परिसरात सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. सध्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांचीही संख्या वाढली आहे. मात्र तलावांमधून येणाऱ्या कुजक्या दुर्गंधीयुक्त वासामुळे नागरिकांना नाक दाबून फिरावे लागत आहे. अनेक तलावांतील पाणी हिरवट झाले असून परिसरात अस्वच्छतेचे चित्र दिसत आहे.
चार दिवसांपूर्वी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी तलाव परिसराची पाहणी केली होती. विशेषतः मासुंदा तलावातील दत्ताघाट परिसरात गाळ मोठ्या प्रमाणात साचल्याने दुर्गंधी अधिक वाढल्याचे निदर्शनास आले.
महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकारी मनिषा प्रधान यांनी सांगितले की, उन्हाळ्यामुळे तलावांचे पाणी आटले असून गाळ आणि शेवाळ वाढले आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होत आहे.
पावसाळ्यापूर्वी गाळ उपसणार
पालिकेकडून तलावांमध्ये एरिएशन सिस्टम सुरू ठेवण्यात आली असून गाळ काढण्यासाठी संबंधित ठिकाणी मार्किंग करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी मासुंदासह सर्व तलावांमधील गाळ उपसण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच बायोप्रॉडक्टचा डोस वाढविण्याचेही नियोजन आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर
दुर्गंधी कमी करण्यासाठी फ्लोटिंग वेटलँड आणि एरिएशन प्रणाली एकत्रित असलेली नवीन तंत्रज्ञान प्रणाली बसवण्यात येणार असून त्यासाठी तलाव परिसरात चौकोनी संरचना उभारण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.