तक्रार केल्याच्या रागातून महिलेला अमानुष मारहाण

​उल्हासनगर: पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून एका महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर कॅम्प ३ मधील हडकमाता परिसरात समोर आली आहे.

आरोपींनी महिलेवर हल्ला करून तिचे केस कापले आणि गळ्यात चपलांची माळ घालून तिची धिंड काढल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांता राजपूत या आपली बहीण गीता राजपूत आणि मुलगी अंजली यांच्यासह मध्यवर्ती (सेंट्रल) पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी जात होत्या. दरम्यान, सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हडकमाता चौक येथील गल्लीत आरोपींनी त्यांना अडवले. नितीन थोरात याने लाकडी दांडक्याने महिलेच्या डोक्यावर वार केला, तर इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

​आरोपींनी महिलेचे केस कापून आणि गळ्यात चपलांची माळ घालून तिचा विनयभंग व अपमान केला, असे तक्रारीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना काही तरुण मोबाईलवर व्हिडिओ बनवत होते. फिर्यादीच्या बहिणीला आणि मुलीलाही मारहाण करण्यात आली असून त्या जखमी झाल्या आहेत. तक्रार मागे न घेतल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

​या प्रकरणी सेंट्रल पोलिसांनी ज्युली वाघरी, विणु वाघरी, पप्पी वाघरी, नितीन थोरात, रोहित वाघरी, सोनु उर्फ बालू वाघरी, महेश वाघरी आणि इतर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.