अंबरनाथ: अखेर अंबरनाथ नगरपालिकेमध्ये देखील शिवसेना भाजपा यांची युती झाली आहे. युती झाल्याची घोषणा शिवसेनेतर्फे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष नंदकुमार परब यांनी केली. शहर विकास हितासाठी युतीचा फॉर्म्युला ठरला आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि भाजपा यांची युती आहे. मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांची युती फिस्कटली होती. दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या. थेट नगराध्यक्षापदी भाजपाच्या तेजश्री करंजुले-पाटील यांची निवड झाली होती. 59 सदस्य असलेल्या नगरपालिकेत शिवसेना 27, भाजपा 14, काँग्रेस 12, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चार आणि दोन अपक्ष असे संख्याबळ आहे. काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपत विलीन झाला आहे.
शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी युती केली तर भाजपाने काँग्रेसच्या 12 नगरसेवकांची अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली होती. दोन्ही अपक्षांपैकी प्रत्येकी एकाने भाजपला तर एकाने सेनेला पाठिंबा दर्शवला आहे. जागेच्या वादाचा मुद्दा जिल्हाधिकारी यांच्याकडे होता. निवडणुका होऊनही विषय समिती सभापती यांच्या निवडणुका न झाल्याने विकास कामांवर त्याचा परिणाम जाणवू लागला होता. त्याचाही निकाल शिवसेनेच्या बाजूने लागला होता. शिवसेनेने भाजपकडे युतीबाबत प्रस्ताव मांडला होता. अखेरीस आज शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे युतीच्या दोन्ही नेत्यांनी जाहीर केले.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानसार अंबरनाथमध्ये युती झाल्याचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले. अंबरनाथच्या नागरिकांनी युतीच्या बाजूने निर्णय दिला होता. शहरविकासाचे हीत लक्षात घेऊन युतीचा निर्णय झाला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार इतर कार्यवाही होईल. शहर विकास हाच फॉर्म्युला ठेवून युतीचा निर्णय झाला असून यामध्ये कोणतीही शंका शिल्लक नसल्याचे जिल्हाप्रमुख लांडगे यांनी स्पष्ट केले.
देशात आणि राज्यात तसेच ठाणे जिल्ह्यात शिवसेना-भाजपा यांची युती आहे, त्याचप्रमाणे अंबरनाथमध्येही युती करण्यात आल्याचे भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकुमार परब यांनी सांगितले. आवश्यक बाबींची वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे. एकदिलाने युतीचा निर्णय झाला असल्याचे जिल्हाध्यक्ष परब यांनी सांगितले.
आज झालेल्या युतीच्या घोषणेप्रसंगी आमदार डॉ. बालाजी किणीकर, भाजपाचे प्रदेश नेते गुलाबराव करंजुले-पाटील, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील, उप नगराध्यक्ष सदाशिव पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक अब्दुल शेख, भाजपा गटनेते अभिजित करंजुले, सचिन पाटील, निखिल चौधरी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.