खारघरमध्ये उभे राहणार भारत-आफ्रिका व्यापार केंद्र

एआयईएफ आणि सिडकोमध्ये सामंजस्य करार

मुंबई : सिडको आणि आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशन (एआयईएफ) यांनी 14 मे 2026 रोजी मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आफ्रिका भारत आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र विकसित करण्याकरिता करारावर स्वाक्षऱ्या करून आदान-प्रदान करण्यात आले.

सिडकोतर्फे आफ्रिका भारत व्यापार केंद्र (एआयबीसी) नवी मुंबई येथे प्रस्तावित असून भारत व आफ्रिकन राष्ट्रांमधील आर्थिक, व्यापारी व सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे एकात्मिक केंद्र म्हणून हा प्रकल्प संकल्पित आहे.

द्वीपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि संस्थात्मक भागीदारी यांना चालना देण्याच्या उद्देशाने आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशन (एआयईएफ) यांच्या सहयोगाने हा प्रकल्प आकारास येणार आहे. ग्लोबल साउथ देशांमधील सहकार्याकरिता भारताचे नेतृत्व मान्य होत असताना, भारत-आफ्रिकेतील सध्याच्या 96 अब्ज अमेरिकन डॉलर भागीदारीच्या क्षमता अधिक वाढीस लागाव्यात याकरिता हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.

महाराष्ट्र शासनाने यापूर्वी संकल्पनेला आणि नाविन्यपूर्ण एसपीव्ही मॉडेलद्वारे त्याच्या अंमलबजावणीला मान्यता दिली होती. यामध्ये एआयईएफ 74टक्के भागधारक असेल आणि सिडकोकडे 26टक्के भागभांडवल असेल. सिडको एआयईएफच्या सहकार्याने खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्कमध्ये आफ्रिका भारत आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र (एआयआयडीझेड) उभारत आहे. हा प्रकल्प एकूण एसपीव्ही रचना तसेच यशस्वी व्यापारी केंद्रासाठी कामगिरी निकष सुलभ करेल. एआयआयडीझेड पुढील 5 ते 6 वर्षांत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

स्वयंपूर्ण कॅम्पस म्हणून संकल्पित, आफ्रिका भारत आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र (एआयआयडीझेड) मध्ये कमर्शियल टॉवर, कॉन्फरन्स सेंटर आणि हॅबिटॅट ब्लॉक यासह अनेक सुविधा एकत्रित केल्या आहेत. आफ्रिकन आणि भारतीय व्यवसाय, सरकारे आणि भागधारक यांच्यात अखंड संवाद आणि करारांसाठी हे संकल्पित केले आहे. व्यवसाय, व्यापार कार्यालये आणि सांस्कृतिक प्रतिनिधित्व यांना भरभराट होण्यासाठी वन-स्टॉप प्लॅटफॉर्म तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. केंद्राच्या एकात्मिक सुविधांमध्ये अडीच लाख चौ. फूट प्रदर्शन जागा, बैठक कक्ष आणि 54 आफ्रिकन देशांसाठी तसेच भारतीय सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांसाठी कायमस्वरूपी कार्यालये यांचा समावेश आहे. व्यवसाय आणि भागधारकांसाठी वेळ, खर्च आणि गुंतागुंत कमी करताना वाढ, विशेषीकरण आणि विस्तारासाठी हे उत्प्रेरक म्हणून काम करेल. दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि चीनमधील सीएईटीईसारख्या जागतिक मानकांचे अनुकरण करून, एआयबीसी आफ्रिका-भारत व्यापार आणि वाणिज्यासाठी एक प्रमुख केंद्र बनण्यास सज्ज आहे. याचा जीडीपी आणि आर्थिक विकासावर लक्षणीय परिणाम होण्याचा अंदाज आहे.

या प्रसंगी असीम गुप्ता, अतिरिक्त मुख्य सचिव, नगरविकास, विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको; शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको डॉ. जी. रथिनवेलू, अध्यक्ष, आफ्रिका इंडिया ईकॉनॉमिक फाऊंडेशन, श्री. टी. एस. तिरुमूर्ती, राजदूत व संयुक्त राष्ट्रसंघ, न्यूयॉर्क येथील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.