कधीही कोसळू शकतात ९३ अतिधोकादायक इमारती!

ठाण्यात ४४३७ धोकादायक इमारतींमध्ये साडेतीन लाख रहिवाशांचा जीव टांगणीला

ठाणे: ठाणे शहरात पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून तब्बल ४४३७ धोकादायक इमारतींमधील साडेतीन लाख रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. जुने ठाणे आणि कळवा, दिवा-मुंब्र्यात अशा इमारतींचे प्रमाण जास्त असून ९३ इमारती कधीही कोसळू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.

शहरातील ४४३७ धोकादायक इमारतींमध्ये सुमारे ८९,८३५ कुटुंबांचे वास्तव्य असून या कुटुंबांतील सुमारे तीन लाख ४९,२१९ रहिवाशांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार आहे. याशिवाय शहरातील १०,८७० वाणिज्य गाळे देखील धोकादायक असल्याची माहिती महापालिकेच्या अहवालातून समोर आली आहे.

पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये म्हणून ठाणे महापालिकेने इमारतींचे संरचनात्मक सर्वेक्षण केले असून अतिधोकादायक, धोकादायक तसेच दुरुस्तीयोग्य इमारतींचे वर्गीकरण केले आहे. यानुसार ९३ इमारती अतिधोकादायक (सी1) श्रेणीत असून त्या कोणत्याही क्षणी कोसळू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर १९५ इमारती धोकादायक (सी2ए) श्रेणीत आहेत. याशिवाय २ हजार ५८१ इमारती सी2बी म्हणजे मोठ्या दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या प्रकारात आणि १५६८ इमारती सी3 म्हणजे किरकोळ दुरुस्ती आवश्यक असलेल्या प्रकारात मोडतात.

सर्वाधिक धोकादायक इमारती ह्या मुंब्रा परिसरात असून येथे तब्बल १३६२ इमारती धोकादायक आढळल्या असून ९१०३ वाणिज्य गाळ्यांची स्थितीही चिंताजनक आहे. या परिसरातील ४६ हजार ६३० कुटुंबांतील सुमारे एक लाख ८९,७६५ नागरिक धोकादायक इमारतींमध्ये राहत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्या खालोखाल दिवा परिसरातही ५५२ इमारती धोकादायक असल्याचे आढळले असून २३,१५८ कुटुंबांतील ९२,६३२ नागरिक या इमारतींमध्ये राहत आहेत. वागळे प्रभागात १,१०२ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. नौपाडा-कोपरी भागात ४३८, कळवा येथे २८६, लोकमान्यनगरमध्ये २५७, माजिवडा येथे १९३, उथळसरमध्ये १७८ आणि वर्तकनगरमध्ये ६९ इमारती धोकादायक यादीत समाविष्ट आहेत.

महापालिकेकडून अतिधोकादायक इमारतींना तातडीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित रहिवाशांना घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले असून आवश्यक त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सी2बी आणि सी3 प्रकारातील इमारतींच्या मालकांना तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून त्यांच्यावर तोडक कारवाई करण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे.