ठाण्यात नालेसफाई मजुर उघड्यावर

स्थलांतरित कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
ठाणे: पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांदरम्यान स्थलांतरित मजुरांच्या अमानुष परिस्थितीचा गंभीर मुद्दा समोर आला आहे.
जळगाव आणि मालेगाव येथून आणलेल्या सुमारे ३० मजुरांना निवारा, स्वच्छ पाणी, शौचालय आणि सुरक्षेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप श्रमिक जनता संघाने केला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी महापौर आणि आयुक्तांना अत्यंत तातडीचे पत्र देत तत्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
नौपाडा प्रभाग समितीअंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईसाठी संबंधित ठेकेदाराने ग्रामीण भागातील मजूर ठाण्यात आणल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या मजुरांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असून, काही दिवस ते दादोजी कोंडदेव स्टेडियम परिसरात उघड्यावर राहत असल्याचे निदर्शनास आले. स्टेडियममध्ये कार्यक्रम असल्याने त्यांना तेथूनही हटविण्यात आल्याने आता त्यांच्या डोक्यावर छतच उरले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. खैरालिया यांनी ८ आणि ९ मे रोजी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान हे कामगार उघड्यावर जेवण करत असल्याचे पाहिल्याचे पत्रात नमूद केले आहे. महिलांच्या सुरक्षेपासून लहान मुलांच्या आरोग्यापर्यंत अनेक प्रश्न निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने सुरक्षित निवार्‍याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मजुरांना दररोज केवळ ६०० रुपये दिले जात असल्याची माहिती मुकादमाने दिल्याचा उल्लेख पत्रात आहे. हे मानधन किमान वेतन कायद्याच्या निकषांपेक्षा कमी असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. धोकादायक स्वरूपाच्या नालेसफाईच्या कामासाठी मजुरांना केवळ जाकीट देण्यात आले असून, इतर कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध नसल्याचा दावाही करण्यात आला आहे. कामगारांच्या वेतनवाटपावर महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांची देखरेख असावी, तसेच कामादरम्यान दुखापत झाल्यास उपचाराची संपूर्ण जबाबदारी ठेकेदारावर निश्चित करण्यात यावी, तसेच ठेकेदारांच्या बिलांपूर्वी ‘कामगार तपासणी’ची मागणी करण्यात आली आहे.