कचरा प्रकल्पामुळे उल्हासनगरला मिळणार दुर्गंधीतून मुक्ती

महापौर व आमदारांनी केली प्रकल्पाची पाहणी

​उल्हासनगर: उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ५ परिसरातील डम्पिंग ग्राउंडमुळे निर्माण झालेली आरोग्याची समस्या आणि नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेता, बदलापूर येथील वालिवली परिसरात आकाराला येत असलेल्या एकात्मिक घनकचरा प्रकल्पामुळे आता मोठा दिलासा मिळणार आहे.

या प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मंगळवारी उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम, आमदार कुमार आयलानी, उपमहापौर अमर लुंड आणि विविध पक्षांच्या नगरसेवकांनी प्रकल्पाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.

सहा दिवसांपूर्वीच महापालिकेच्या महासभेत भाजप नगरसेवकांनी डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले होते, त्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

​बदलापूर (पूर्व) येथील वालिवली परिसरात २३ एकर जागेत सुमारे १४८ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या ठिकाणी बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या तीनही शहरांतील दररोज ६०० मेट्रिक टनांहून अधिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

या प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत, तर सुक्या कचऱ्यापासून इंधन निर्मिती केली जाईल. तसेच प्लास्टिक, काच, कापड आणि बांधकामातील टाकाऊ वस्तूंवर पुनर्प्रक्रिया करण्याची अत्याधुनिक व्यवस्था येथे करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे एकूण कचऱ्यापैकी ५५ टक्के कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल, तर उर्वरित ४५ टक्के कचऱ्यापासून खत निर्मिती होणार असल्याने डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होईल.

​पाहणी दौऱ्यादरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कचऱ्यावरील प्रक्रिया पद्धतीची माहिती दिली असून, प्रकल्पाच्या मुख्य शेडचे काम ९० टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रकल्पात यंत्रसामग्री बसवण्याचे काम सुरू होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या क्लस्टर प्रकल्पामुळे प्रदूषण नियंत्रणात येईल आणि अंबरनाथ-उल्हासनगर पट्ट्यातील नागरिकांना दुर्गंधीपासून मुक्ती मिळेल.

या दौऱ्यात स्थायी समिती सभापती कलवंत सिंह सोहता, विरोधी पक्षनेत्या अंजली साळवे, आरोग्य सभापती सविता तोरणे-रगडे, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, भाजप गटनेते राजेश वधारिया आणि इतर मान्यवरांसह पालिका अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे कॅम्प नंबर ५ मधील डम्पिंगच्या त्रासातून नागरिकांची लवकरच सुटका होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.