पाणी न दिल्यास व्हॉल्व बंद करून नवी मुंबईचे पाणी बंद करणार

पनवेल विरोधी पक्षनेत्यांचा नवी मुंबई महानगरपालिकेला इशारा

नवी मुंबई: पनवेलमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असून अतिरिक्त पाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडे मागणी केली आहे. येत्या काही दिवसांत हा प्रश्न निकाली निघाला नाही तर कळंबोली सर्कलजवळील मोरबे धरण जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करून नवी मुंबईकरांचे पाणी रोखणार अशी धमकी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी दिली आहे.

संपूर्ण एमएमआर क्षेत्रात पाणी टंचाई असताना नवी मुंबई शहर मात्र जलसंपन्न आहे. नवी मुंबई शहराने स्वतःचे मोरबे धरण उभारले असून शहरवासीयांना रोज ४२० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. या मोरबे धरणाची जलवाहिनी पनवेलमधून नवी मुंबईत येते. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने पनवेलकरांना देखील रोज ३० एमएलडी पाणी द्यावे, अशी मागणी अरविंद म्हात्रे यांनी केली असून याबाबत त्यांनी पनवेल व नवी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्त, महापौर यांना निवेदन दिलेले आहे. यावर अद्याप कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे याबाबत मंगळवार २८ एप्रिल रोजी नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांची म्हात्रे यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी नवी मुंबई शहराचा पाणी खंडित करण्याचा इशारा दिला आहे.