मुंबई: राज्याचे लक्ष लागलेल्या विधानपरिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून पाच नावांची घोषणा झाली आहे. यात ठाण्यातील माधवी नाईक यांचा समावेश आहे.
भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील पाच विधानपरिषदांच्या जागेसाठी पाच नावांची घोषणा केली. त्यामध्ये ठाण्यातून गेली अनेक वर्षे भाजपाच्या संघटनेत काम करणाऱ्या ऍड. माधवी नाईक यांचा समावेश आहे. नाईक या सध्या महामंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांनी या आधीही संघटनेत महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना देखील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अहिल्यानगरमधील विवेक कोल्हेंना विधानपरिषदेची संधी मिळाली आहे. सुनिल कर्जतकर, संजय भेंडे, प्रमोद जठार यांनाही उमेदवारी जाहीर केली आहे.
संजय भेंडे भाजपचे उपाध्यक्ष असून ते नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, प्रमोद जठार यांनाही भाजपने संधी दिली असून जठार हे कोकणातील भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. कोकणावर अन्याय होत असल्याची भावना भरुन काढण्याचा प्रयत्न भाजपकडून या उमेदवारीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
कोल्हे परिवाराचे नगर जिल्ह्यात वर्चस्व मानले जाते. विवेक कोल्हे हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत.