भ्रष्टाचार रोखण्यासाठी पीएमओचा निर्णय
ठाणे : ठाण्यातील अनेक विकास कामांसाठी केंद्र आणि राज्याने ठाणे महापालिकेला शेकडो कोटींचा निधी दिला असून त्यावर भ्रष्टाचाराचे थेट आरोप झाले आहेत. बहुचर्चित अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोसाठी देखील १२ हजार कोटी मंजूर करण्यात आले असून यात मोठ्या भ्रष्टाचाराची शक्यता व्यक्त होत आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी या प्रकल्पाच्या कामावर आता थेट पंतप्रधान कार्यालयाची नजर असणार आहे.
ठाणे शहराच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून प्रस्तावित असलेल्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर सुरुवात झाली आहे. २९ किमीच्या या प्रकल्पासाठी सुमारे १२ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प ठाण्यासाठी महत्त्वाकांक्षी मानला जात असला तरी त्यावर आता थेट पंतप्रधान कार्यालयाची (पीएमओ) नजर असणार आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रगती’ प्लॅटफॉर्मवर या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत पीएमओ कार्यालय या प्रकल्पाचा आढावा घेणार असल्याने महामेट्रो आणि ठाणे महापालिकेने कामाचा वेग वाढवला आहे. दरम्यान पीएमओच्या एण्ट्रीमुळे प्रकल्पातील संभाव्य भ्रष्टाचार आणि प्रशासकीय दिरंगाईला चाप बसणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
नवी दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रात पहिल्यांदाच अंतर्गत मेट्रोचा प्रकल्प ठाण्यात आकार घेत आहे. ठाणे महापालिकेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असला तरी त्याचे संपूर्ण काम महामेट्रो करणार आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी देण्यात आला असून एकूण १२ हजार कोटींच्या पुढे या प्रकल्पाचा खर्च होणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामालाही सुरुवात झाली आहे. घोडबंदरजवळ सध्या पाया रचण्याचे काम सुरू असून २०२९ पर्यंत ही अंतर्गत मेट्रो ठाणेकरांच्या प्रवासासाठी सज्ज होईल या दिशेने गती देण्यात येणार आहे. १२ हजार कोटींचा हा प्रकल्प असल्याने त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि संभाव्य भ्रष्टाचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याची कुणकूण पंतप्रधान कार्यालयाला लागल्याचे समजते. म्हणूनच त्याला चाप बसवण्यासाठी संभाव्य गैरव्यवहारांवर थेट लक्ष देण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. हा प्रकल्प आता ‘प्रगती’ पोर्टलवर आणण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्याचा अहवाल थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले असल्याने येत्या दोन-तीन दिवसांपत पीएमओकडून या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे महामेट्रो आणि ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनावर कामाचा वेग वाढवण्यासाठी दबाव निर्माण झाला आहे.
एकूण २९ किमीची ही अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो असून एकूण २२ स्थानके असणार आहेत. रायलादेवी, वागळे चौक, लोकमान्य नगर बस डेपो, छत्रपती शिवाजी महाराज नगर, नीळकंठ टर्मिनल गांधीनगर, आझादनगर बस डेपाो, मनोरमा नगर, कोलशेत, बाळकूम नाका, राबोडी, ठाणे जक्शन, नवीन ठाणे हे मुख्य थांबे असणार आहेत. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबीळ आणि पातलीपाडा या निवसी क्षेत्रातूनही ही अंतर्गत मेट्रो धावणार आहे. यामध्ये २० उन्नत तर दोन भुयारी मार्गाचा समाावेश असून २०२९ मध्ये अंदाजे सात लाख प्रवाशांना रोजचा प्रवास देणारी ही अंतर्गत मेट्रो ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
एकीकडे पीएमओ लक्ष घालत असतानाच, दुसरीकडे पर्यावरणवादी आणि नगररचना अभ्यासकांनी या प्रकल्पाच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘ठाण्याला खरोखरच वर्तुळाकार मेट्रोची गरज नसल्याचे सांगत काही तज्ञांनी याला ‘पांढरा हत्ती’ म्हटले आहे. दरम्यान घोडबंदर भागातील नागरिकांनी तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी भाजप आमदार संजय केळकर यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या संयुक्त बैठकीत मेट्रोच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.