‘गोल्डन अवर’ मधून ६४,७५९ पशुधनाला जीवदान

दुर्गम भागातील ३४,९७९ पशुपालकांना लाभ

ठाणे: अद्ययावत तंत्रज्ञान आणि 1962 मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना मोठा आधार मिळाला आहे. या सुविधेमुळे केवळ उपचारांमधील वेळच वाचला नाही, तर दुर्गम भागातील हजारो पशुधनास वेळेत ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.

‘1962 कॉल सेंटर’ आणि मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्यातील तांत्रिक समन्वयामुळे पशुपालकांना आपल्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या आहेत, जे ग्रामीण समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

वर्षभरात या कॉल सेंटरकडे एकूण चार लाख १,९९२ कॉल्स प्राप्त झाले. अत्यंत कौतुकास्पद बाब म्हणजे, यापैकी तीन लाख ७८,०३५ पशुधनाच्या आजारविषयक समस्यांचे यशस्वीरित्या निराकरण करण्यात आले आहे. दुर्गम व डोंगराळ भागातील पशुपालकांसाठी ही सेवा ‘लाईफलाईन’ ठरली असून, तब्बल ३४,९७९ पशुपालकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. हे केवळ आकडे नसून, पशुसंवर्धन क्षेत्रातील समर्पित पशुवैद्यकीय सेवेचे निदर्शक आहे.

अपघात, विषबाधा किंवा कठीण प्रसूती अशा आपत्कालीन स्थितीत ‘गोल्डन अवर’ (पहिली महत्त्वाची घटका) मध्ये उपचार मिळणे अनिवार्य असते. कॉल आल्यानंतर अवघ्या १.५ तासात पशुवैद्यकीय पथक प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचते. या तत्परतेमुळे एकूण ६४,७५९ पशुधनाचे प्राण वाचले आहेत. यामध्ये २९,१३० मोठे पशुधन व ३५,५६९ लहान पशुधनाचा समावेश आहे. पशुवैद्यकीय शास्त्रात ‘गोल्डन अवर’ मधील उपचारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण या काळात मिळालेले उपचार पशुधनाच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करतात.

पूर्वी किरकोळ आजारासाठीही पशुधनाला दवाखान्यात नेणे जिकिरीचे व महागडे ठरत असे, परंतु आता तज्ज्ञ पशुवैद्यक स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहेत. यामुळे केवळ आजार बरे होत नाहीत, तर वेळेवर मिळालेल्या मार्गदर्शनामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही सुलभ झाले आहे.

परिणामी, दुग्धव्यवसाय हा केवळ उपजीविकेचे साधन न राहता एक शाश्वत व फायदेशीर व्यवसाय म्हणून आकारास येत आहे. शेतकऱ्यांमधून या सेवेबाबत समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.