धूर येताच प्रवासी उतरले आणि बसने घेतला पेट!

* सुदैवाने १४ प्रवासी बचावले, शिवशाही बस जळून खाक
* ठाणे सॅटीस पुलावरील दुर्घटना

ठाणे: पुण्यातील स्वारगेटवरून वसईकडे जाणाऱ्या एसटीच्या शिवशाही बसने ठाणे स्टेशनवरील सॅटीस पुलावर पेट घेतला. यात बस जाळून खाक झाली. सुदैवाने प्रसंगावधान राखून चालक-वाहकांनी धूर निघताच १४ प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

गुरुवारी दुपारी १.३०च्या दरम्यान ठाणे एस. टी. स्थानकात ही बस आली होती. या बसमधून ठाण्याचे प्रवासी उतरले होते तर वसईकडे जाणारे चार प्रवासी आणि बसमधील दहा अशा १४ प्रवाशांना घेऊन बस जात असताना सॅटीस पुलावर इंजिनमधून धूर येत असल्याचे बसचालक संतोष गवळी आणि वाहक मिलिंद सोनवणे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रवाशांना तत्काळ बाहेर काढले. त्यानंतर बसने पेट घेतला.

या दुघटनेची माहिती अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आल्यानंतर जवाहर बाग अग्निशमन दलाच्या जवानांनी एक पाण्याचा टँकर आणि एक बंब यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे पुलावर एकच गोंधळ उडाला होता. सुमारे अर्ध्या तासाने ही आग आटोक्यात आणण्यात आली.

या बसमध्ये एका महिला प्रवाशाचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग राहून गेली होती. या आगीत महिलेचे सर्व सामान जळाले. परंतु आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सोन्याचे दागिने मिळवून ते प्रवाशाच्या स्वाधीन केले.

या दुघटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक संजय वाघुले आपत्ती व्यवस्थापन विभागाचे श्री. तडवी, पोलिस अधिकारी-कर्मचारी, एस.टी. महामंडळाचे अधिकारी यांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली. बसमधील रस्त्यावर सांडलेले तेल आपती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हटवले आणि दुपारी 3 वाजता वाहतूक सुरळीत सुरु झाली.

सॅटीस पुलावर एस. टी.च्या शिवशाही बसला आग लागल्यानंतर ठाणे अग्निशमन दलाच्या गाडीला पोचण्यासाठी किमान २० ते २५ मिनिटांचा अवधी लागला. मात्र, दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या आवारात तात्पुरत्या स्वरुपात अग्निशमन दलाची गाडी ठेवलेली असती तर घटनास्थळी ५ ते १० मिनिटांत अग्निशमन दलाचे जवान पोचून शिवशाही बसची आग लवकर आटोक्यात येऊन बस खाक झाली नसती, असे मत भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी व्यक्त केले.

ठाणे स्टेशनला जिथे टीएमटीच्या एवढ्या बस ये-जा करत असतात आणि काही बस उभ्यासुद्धा असतात, तेथे एखाद्या बसला आग लागली तर प्राथमिक स्तरावर आग विझविण्यासाठी कोणतीच यंत्रणा उपलब्ध नसावी याचे आश्चर्य वाटते!
एसटी डेपोही हाकेच्या अंतरावर असताना धूर निघाल्याबरोबर काही करता आले असते तर नुकसान टाळता आले असते, अशी प्रतिक्रिया जागरूक ठाणेकर विद्याधर पोखरकर यांनी दिली.