पाच लाखांपर्यंत मोफत उपचार; ठाण्यात दीड लाख रुग्णांना लाभ

आयुष्मान आणि जन आरोग्य योजनेची प्रभावशाली अंमलबजावणी

ठाणे: एप्रिल 2024 ते मार्च 2026 या कालावधीत केंद्र सरकारची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित आरोग्य योजनांअंतर्गत ठाणे जिल्ह्यात तब्बल एक लाख 54,874 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून, जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे (सिव्हिल) येथेही 240 रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे;

ठाणे जिल्ह्यात एकूण 40 शासकीय व 115 खाजगी अशा 155 अंगीकृत रुग्णालयांसह 32 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 126 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे मिळून तब्बल 313 आरोग्य सुविधा या योजनांअंतर्गत कार्यरत आहेत. तरीदेखील, महागड्या खाजगी उपचारांच्या भीतीने किंवा माहितीअभावी अनेक नागरिक सरकारी यंत्रणेकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येते.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना चांगले उपचार दिले जातात त्यामुळे सिव्हिल रुग्णालय हेच सर्वसामान्य, कामगार, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सर्वात मोठा आधार ठरत आहे. येथे शासनाच्या योजनांमुळे अनेक गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळत असल्याची माहिती वरीष्ठ जिल्हा समन्वयक डॉ. रविंद्र जगतकर यांनी दिली.

आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असताना, योजनांचा लाभ न घेणे हीच सर्वात मोठी हानी ठरत आहे. आयुष्मान कार्डच्या माध्यमातून लाखो रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळू शकतात, मात्र त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया मोबाईल अॅपद्वारे नोंदणी, आधार पडताळणी आणि e-KYC अनेकांना अजूनही माहिती नाही.

शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार मोफत उपलब्ध आहेत. पात्र नागरिकांनी पुढाकार घेऊन आयुष्मान कार्ड काढावे आणि या योजनांचा पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कैलास पवार यांनी केले आहे.

“गेल्या काही दिवसांपासून मला अंबिलिकल हर्नियाचा त्रास होत होता. मात्र आयुष्मान भारत योजना अंतर्गत सिव्हिल रुग्णालयात मला वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळाले. कोणताही आर्थिक भार न पडता उपचार झाल्याने मला मोठा दिलासा मिळाला, असे नवी मुंबई येथील रुग्ण सुनील पांडे यांनी सांगितले.