शिवसेनेच्या तिरक्या चालीने भाजप बिथरली
ठाणे: `नारी शक्ती वंदन अधिनियम’ विधेयक मंजूर न करणाऱ्या काँग्रेससह विरोधी पक्षांच्या भूमिकेच्या निषेधार्थ ठाणे महापालिकेची महासभा दिवसभरासाठी तहकूब करण्याची भाजपची मागणी महापौर व प्रशासनाने नाकारल्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दुसरीकडे निवडणुकांना अडीच महिने उलटूनही स्थायी समितीसह विविध विषय समित्या स्थापन करण्यात येत नसल्याने भाजपच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा निषेध करण्यासाठी महासभा तहकूब करण्याची मागणी भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांनी केली. मात्र, या मागणीचे पत्र महापौर व महापालिका सचिवांकडून स्वीकारण्यात आले नाही. त्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर घोषणा देत निषेध केला. या आंदोलनात उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेविका नंदा पाटील, नम्रता कोळी, अर्चना मणेरा, मृणाल पेंडसे, काजोल गुणिजन, उषा वाघ, वेदिका पाटील, माधुरी मेटांगे, अनिता भोईर यांच्यासह नगरसेविका सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान आज भाजप गटनेत्याच्या ठामपा मुख्यालयातील कार्यालयाचे उदघाटन करताना आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेवर टीका केली. सभागृहात कोणी विषय रेटून नेत असेल, आवश्यक विषय टाळत असतील तर ते खपून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा श्री. केळकर यांनी सत्ताधारी शिवसेनेला दिला आहे. ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट संपून लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी, स्थायी समिती, विषय समित्या तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या अद्याप प्रलंबित आहेत. यावरून केळकर यांनी नाराजी व्यक्त केली. ठाणेकरांच्या हितासाठी तरी सर्व समित्या लवकरात लवकर स्थापन करा, असा टोला लगावत श्री. केळकर यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर शरसंधान केले.