नायगाव-घोडबंदर ‘रो-रो’ सेवेला हिरवा कंदील

वसई: वसई-विरार शहरातील मत्स्यव्यसायाला आधुनिकतेची जोड मिळावी यासाठी वसईत अत्याधुनिक मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची तसेच महामार्गावरील कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी नायगाव (जुचंद्र) ते घोडबंदर दरम्यान ‘रो-रो’ सेवा सुरू करण्याची मागणी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पांसाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

वसई-विरार हे समुद्रकिनारी वसलेले शहर असल्यामुळे अनेकांसाठी मत्स्यव्यवसाय हे त्यांच्या उपजिविकेचे प्रमुख साधन आहे. पण, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण नसल्याने शहरातील तरुणांना प्रशिक्षणासाठी इतर जावे लागते. त्यामुळे वसईत अत्याधुनिक मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली. सोमवारी मंत्रालयात या संदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली.

यावेळी हे प्रशिक्षण केंद्र वसईत सुरू झाल्यास युवकांना आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान, हॅचरी व्यवस्थापन व केज कल्चर , ऑर्नामेंटल फिशरी व मत्स्य संवर्धन , मत्स्य प्रक्रिया, पॅकेजिंग व मूल्यवर्धन, कोल्ड चेन व्यवस्थापन रेडी-टू-ईट उत्पादन निर्मिती तसेच सागरी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण या सारख्या क्षेत्रात प्रशिक्षण देता येईल. तसेच स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व महिला बचत गटांना प्रक्रिया उद्योगात सहभागी होण्याची संधी मिळून आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल असेही आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी सांगितले.

या मागणीची दखल घेत मंत्री नितेश राणे यांनी प्रशिक्षण केंद्रासाठी तातडीने जागा निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकल्पासाठी ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजने’अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रशिक्षण केंद्र आणि विविध योजनांच्या समन्वयासाठी एका समन्वयकाची नियुक्ती करण्याच्या सूचनाही मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाहनचालक प्रवास करतात. तर वाहनांची वाढलेली संख्या आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे बोरीवली-विरार दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी नायगाव (जूचंद्र) ते घोडबंदर या जलमार्गावर ‘रो-रो’ सेवा सुरू करण्याची मागणीही या बैठकीदरम्यान करण्यात आली होती. तर ही रो-रो सेवा लवकरच सुरू केली जाईल, असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिले आहे.